पालखी प्रस्थानासाठी देहू सज्ज

महावितरण, वैद्यकीय, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण

देहूगाव – जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांची आषाढी वारी 334 वा पालखी सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान सज्ज झाले आहे. मंदिरातील किरकोळ कामे वगळता पालखी रथाचे विविध कामे पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती संस्थानकडून देण्यात आली आहे. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे देहू मुख्य मंदिरातून सोमवारी (दि. 24) प्रस्थान ठेवणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. मंदिर व परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. महावितरण, वैद्यकीय विभाग तयारी पूर्ण झाली आहे. याशिवाय भाविकांना रांगेत दर्शन घेण्यास दर्शनबारी तयार केली आहे.

सोहळ्यातील पालखी रथास जुंपण्यास आणि चौघडा गाडीसाठी लागणारे बैलजोडीची निश्‍चित करण्यात आले आहे. चांदीचे रथ व पालखी, गरूड टक्‍के, अब्दागिरी, चोप आदी साहित्यांना चकाकी देण्यात आली आहे.तसेच पालखी रथाचे विविध कामे करण्यात आली आहे. महाद्वारावरील नगारखान्याच्या दर्शनी भागात गरूडावर विराजमान होत पांडूरंगाच्या भेटीस जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज वैकुंठाला निघाले असल्याचे मूळ स्वरुपातील मूर्ती बसविण्यात आली आहे, अशी माहिती संस्थांने अध्यक्ष ह.भ.प. मधुकर भिकाजी मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. संजय दामोदर मोरे, ह.भ.प. अजित लक्ष्मण मोरे, ह.भ.प. काशिनाथ गणपत मोरे यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत प्रशासन सज्ज

यात्रेपूर्वी देहूमध्ये मुख्य मंदिर, वैकुंठगमण मंदिर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या चार ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग 22 ते 26 जून असा सुरू ठेवण्यात आला आहे. गाथा मंदिरात जागा व बसण्यास टेबल, खुर्चीचे साहित्याची सहकार्य न मिळाल्याने तेथील बाह्यरूग्ण तपासणी केंद्र ग्रामपंचायती जवळ सुरू करण्यात येणार आहे. तसेच परिसरातील हॉटेल, दुग्धालये, भोजनालये, स्वीट मार्ट आणि चहाच्या टपऱ्या आदी 40 दुकानांना सूचना वजा नोटीस दिल्या आहे. या सर्व दुकानदारांना मेडीक्‍लोरचे वाटप करण्यात आले आहे. अचानक तेथील पाण्याचे नमूने त्वरीत तपासले जात आहे. मोफत दिलेले मेडीक्‍लोर व नोटीसांनंतरही अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

वैद्यकीय पथक तैनात

देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यात्रा काळात स्थानिक रुग्णांबरोबरच 450 ते 500 अतिरिक्‍त रुग्णांना तपासून त्यांच्यावर औषधोपचार केले जातात. यासाठी 22 ते 26 जून या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन वैद्यकीय अधिकारी, एक आरोग्य सहाय्यक, एक आरोग्य सेवक, दोन आरोग्य सेविका, एक औषध निर्माता, तीन परिचर, एक वाहन चालक यांच्याबरोबरच प्रतिनियुक्‍तीवर पाच वैद्यकीय अधिकारी, 10 आंतरवासिता डॉक्‍टर, तीन आरोग्य सहाय्यक, 18 आरोग्य सेवक, 15 आरोग्य सेविका व तीन औषध निर्माण अधिकारी, सहा रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत.

औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध

यात्रेपूर्वी रुग्णालयात पुरेसा औषधांचा साठा करण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली. जुलाब-उलट्या, हिवताप, अंगदुखी, टायफॉईड, डेंग्यू या आजारांवर लागणारी औषधे व याशिवाय प्रतिजैविके व अन्य आजारांवर लागणाऱ्या औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, औषधे कमी पडणार नाहीत याची दक्षता आरोग्य विभागाकडून घेतल्याची माहिती डॉ. यादव यांनी दिली.

महावितरण 24 तास ऑड ड्युटी

गावातील विहिरी, बोरवेल, हॉटेल यांचे तपासणीचे नियोजन पूर्ण झाले असून, 27 पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. महावितरणचे कर्मचारी 24 तास सेवा देण्यास सज्ज आहेत. लटकणाऱ्या विद्युत तारा, उपड्या डिपी दुरूस्त केले आहे. विद्युत खांबावर जाहिरात फलक लावण्यात येवू नये याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने यात्रा काळात शुद्ध, नियमित पाणीपुरवठा करावा यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग व देहू ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. प्रत्येक दिंडीस प्रथमोपचार पेटी भेट देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.