विकास आराखड्यानुसार तळवड्यात रस्ता

देहू-आळंदी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण होणार कमी

पिंपरी – महापालिकेच्या वतीने तळवडे परिसरासाठी विकास योजनेतील नियोजित रस्त्याचे काम केले जाणार आहे. संबंधित रस्त्याच्या कामासाठी सर्वसाधारण सभेत 50 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमून महिनाभरात कामाचे अंदाजपत्रक (इस्टीमेट) तयार केले जाणार आहे. त्यानंतर निविदा कार्यवाही होऊन ऑगस्टमध्ये रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्‍यता आहे. संबंधित रस्त्याचे काम दीड ते दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा रस्ता झाल्यानंतर देहू-आळंदी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

महापालिकेकडून विकसित करण्यात येत असलेला हा रस्ता दोन टप्प्यांमध्ये विकसित केला जाणार आहे. तळवडे-चिखली शिव ते इंद्रायणी नदीच्या कडेने 12 मीटर रुंद तर, इंद्रायणी नदीच्या कडेने देहू-आळंदी रस्त्यापर्यंत 24 मीटर रुंद असा रस्ता असणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी आवश्‍यक जागांचे संपादन महापालिकेला करावे लागणार आहे. दरम्यान, रस्त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक करण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि. 26) होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. इन्फ्राकिंग कन्सल्टिंग इंजिनिअर प्रायव्हेट लिमिटेड यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक केली जाणार आहे.

तळवडे चौकामध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असते. तळवडे शिवेवरील प्रस्तावित विकास आराखड्यातील रस्त्यामुळे देहू-आळंदी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होऊनतळवडे आय.टी. पार्क व चाकण औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या वाहनांच्या वेळेत आणि इंधनात बचत होणार आहे.

“तळवडे विकास आराखड्यातील रस्त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत मंजूर झाल्यानंतर महिनाभरात कामाचे अंदाजपत्रक (इस्टीमेट) तयार होईल. त्यानंतर रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध केली जाईल. निविदा कार्यवाही वेळेत पूर्ण झाल्यास ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते. तिथून पुढे काम पूर्ण होण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल.
– प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता, महापालिका

Leave A Reply

Your email address will not be published.