रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; हरविलेले 50 हजार रुपये केले परत

पिंपरी – रस्त्याच्या कडेला रिक्षा चालकाला सापडलेले 50 हजार रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांमार्फत मूळ मालकाला परत दिल्याची सुखद घटना सांगवीत घडली.

जितेंद्र मनोहर गायकवाड असे या रिक्षा चालकाचे नाव असून त्यांनी नुकताच एक महिन्यापूर्वी रिक्षा विकत घेऊन व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. महेश कोळी हे टॅक्‍स ऑफिसमध्ये कामाला असून अभय नरवडे यांनी त्यांना कर भरण्यासाठी 50 हजार रुपये दिले होते. महेश हे पैसे घेऊन मंगळवारी (दि. 4)ऑफिसला दुचाकीवरून पिंपळे गुरवहून कार्यालयात चालले होते. त्यांनी सोबत घेतलेली रक्कम दुचाकीवरून अनवधानाने पीडब्ल्यूडी मैदानाशेजारी पडली.

रिक्षा चालक गायकवाड यांना रस्त्याच्या कडेला पिवळ्या पिशवीत रोख 50 हजार रुपये व महत्वाची कागदपत्रे सापडली.
दरम्यान, रिक्षा चालक गायकवाड यांनी ते पैसे परत करण्यासाठी बुधवारी (दि. 5) सकाळी सांगवी पोलीस ठाणे गाठत 50 हजार रुपये रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द केली. तेवढ्यात योगायोगाने महेश काळे आणि मूळ मालक अभय हे सांगवी पोलिसात पैसे हरवल्याची तक्रार देण्यासाठी आले होते. पोलिसांनी तात्काळ त्यांचेच पैसे आहेत का याची पडताळणी करून संबंधित मूळ मालकाला पैसे परत केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.