पिंपरी – चिंचवडमधील केशवनगर प्रभाग क्र.18 मधील शामा हेरिटेज सोसायटीमधील अचानक मीटर बॉक्समध्ये मोठी आग लागली. यामध्ये सोसायटीतील 14 वीजमीटर जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच महावितरण अधिकाऱ्यांनी धाव घेत, या परिसरातील खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला. याशिवाय याठिकाणी दुरुस्ती करत एकाच दिवसात हे सर्व वीजमीटर बदलून दिले.
केशवनगरमधील शामा हेरिटेज सोसायटीतील के बिल्डिंग मधील 14 मीटर व सर्व जोडणी पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना शनिवारी (दि.11) रात्री दोनच्या सुमारास घडली. त्यानंतर नागरिकांनी महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्याशी संपर्क साधत ही माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, ही बाब महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविली. त्यानंतर आलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांनी या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. ही सर्व कार्यवाही वेळेत केल्यामुळे आग पसरली नाही. अन्यथा घटनास्थळापासून जवळच दुचाकी व चारचाकी वाहने असल्याने मोठी आग लागण्याची शक्यता होती.
या घटनेनंतर सर्वच सोसायट्यांमधील भेदरलेले रहिवासी सोसायटीच्या बाहेर जमा झाले. ही आग विझविल्यानंतर दीड तासांतच अन्य सोसायट्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. याशिवाय या सोसायटीतील 14 मीटर एकाच दिवसांत बदलून देण्यात आले. महावितरणचे पिंपरी विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने आवश्यक ती कार्यवाही केली.
“महावितरण अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सर्व कार्यवाही तत्परतेने केली. एका दिवसात या सोसायटीमधील 14 मीटर उपलब्ध करून देऊन वीज पुरवठा सुरू करून दिला. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
-मधुकर बच्चे, सदस्य, महावितरण समिती