पिंपरी-चिंचवड : पाणीकपातीवर सत्ताधारी नेत्यांचे सोयीस्कर मौन

शहराला आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा; सत्ताधाऱ्यांविषयी शहरात वाढती नाराजी

पिंपरी – पुणे, पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच संपूर्ण जिल्ह्याला पाणीटंचाईचा प्रश्‍न भेडसावत असताना पालकमंत्री गिरीष बापट यांनी मात्र फक्‍त पुणे शहराची प्रस्तावित पाणीकपात रद्द करण्यासाठी प्रसंगी धरणातील मृत पाणीसाठा वापरण्याचे नियोजन केले. पिंपरी-चिंचवड शहरात पाणीटंचाई जाणवत आणि पाणीकपातीचे धोरण जाहीर केलेले असताना शहराचे कारभारी असलेल्या भाजप-शिवसेनेच्या एकाही नेत्याने याबाबत आवक्षर काढलेले नाही. एरव्ही हेच नेते पक्षांच्या वरिष्ठांकडून आपल्याला लाभांची पदे मिळवण्यासाठी अनेकांच्या दाराचे उंबरठे झिजवताना दिसतात. मात्र नागरिकांसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या पाण्याच्या विषयाकडे मात्र सत्ताधारी पक्षातील सर्वच नेत्यांनी सोयीस्करपणे दूर्लक्ष केल्याने भाजप-सेनेच्या या कारभाराविरोधात शहरात प्रचंड नाराजी दिसून येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड असणारे पिंपरी-चिंचवड शहर भाजपने आपल्याकडे खेचून आणले. सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपचा एक खासदार दोन आमदार, शिवसेनेचे दोन खासदार आणि एक आमदार आहे. याशिवाय तीन राज्यमंत्री दर्जा पदे उपभोगणारे नेते आहेत. याशिवाय महापालिका आणि प्राधिकरणावर याच पक्षाची एकहाती सत्ता आहे. सर्व सत्ताकेंद्रे ताब्यात असताना तसेच गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाच्या ताब्यात सत्ता असताना शहरवासियांच्या अडचणींवर मात्र यातील कोणताच नेता पुढे येवून बोलायला तयार नाही.

शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईने उग्र रुप धारण केले असून पाणीकपातीचे धोरण राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पाणीकपात, पाणीटंचाई आणि नागरिकांच्या समस्या यावर एकही नेता पुढे येवून बोलण्यास तयार नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे गिरीश बापटही केवळ पुणे शहरापुरतीच पाणीटंचाईबाबत धोरणे राबवित असल्याने नागरिकांच्या नाराजीत भरच पडली आहे.

पुणे महापालिकेने पाणीकपातीचे जाहीर केलेले धोरण पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठक घेवून पुण्यातील पाणी कपात टाळली. मात्र पिंपरी-चिंचवडकडे दूर्लक्ष केले. यानंतरही डझनभर भाजप-सेना नेत्यांची फौज असतानाही एकाही नेत्याने पाणीकपात टाळण्यासाठी चकार शब्ददेखील काढला नाही. मग या नेत्यांची एवढी मोठी फौज काय कामाची? असा प्रश्‍न नागरिकांतून विचारला जात आहे. विशेष म्हणजे शहरातील आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात, मात्र हे दोन्ही नेते केवळ मंत्रीपदासाठीच आपले सलोख्याचे संबध उपयोगात अणणार आहेत का? असा सवालही सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.
भाजपनेत्यांनी पाणी प्रश्‍नावर मौनव्रत धारण केल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना उद्यापासून (दि.6) दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे, एवढे मात्र निश्‍चित.

या मातब्बर नेत्यांचे मौन कशासाठी?

पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव, राज्यसभा सदस्य अमर साबळे, राज्यमंत्री दर्जा असलेले लोकलेखा समिती अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, सहयोगी आमदार महेश लांडगे, शिवसेना आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार अशी नेत्यांची शहरात मोठी फौज आहे. यावर्सच नेत्यांनी या पाणीकपातीवर मौनव्रत धारण केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.