मिरवणुकीसाठी नवरदेवांचा घोडा खातोय ‘भाव’!

मागणी वाढली : तासाभरासाठी मोजावे लागतात अडीच ते पाच हजार रुपये

पिंपरी – लग्नाचा बार उडविण्यासाठी हल्ली इव्हेंट मॅनेजमेंटचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे लग्न सोहळे हायटेक झाले आहेत. अलिशान मोटारी दिमतीला असल्या तरी घोड्यावरून मिरविण्याची नवरदेवाची हौस कायम आहे. उलट किमान लग्नाच्या निमित्ताने तरी घोड्यावर मिरवण्याची मानसिकता वाढत आहे. त्यामुळे लग्नसराईमध्ये घोड्यांना वाढती मागणी असून तासाभरासाठी अडीच ते पाच हजार रुपये आकारले जात आहे.

शहर व परिसरात सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. लग्नपत्रिका छपाईपासून ते वरातीपर्यंत सर्वकाही सोहळे पार पाडण्यासाठी “इव्हेंट मॅनेजमेंट’ची मदत घेतली जात आहे. “प्री वेडिंग शूट’ पासून हळदी, मेहंदी, साखरपुडा या सर्व विधींमध्ये “फुल्ल टू सेलिब्रेशन’ दिसून येते. काळानुरुप लग्न सोहळ्यात अत्याधुनिकता आली असली तरी नवरदेवाची घोड्यांवरुन मिरवणूक काढण्याची हौस अजूनही कायम आहे. उलट त्यात वाढ झाली असल्याचे वरात तसेच नवरदेवांच्या मिरवणुकीतून पहायला मिळत आहे.

विवाह लागण्यापूर्वी घोड्यावरुन नवरदेवाची मिरवणूक काढली जाते. विवाह सोहळ्यात नवरदेवाच्या वरातीला सर्वाधिक महत्त्व असते. त्यासाठीही घोड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. लग्नात वरातीसाठी घोडा नसल्यास नवरदेव रुसण्याची प्रथा कायम आहे. मुहुर्तांच्या दिवशी घोडे उपलब्ध होत नसल्याचे घोड्यासाठी मालकांकडे अगाऊ बुकींग करावे लागत आहे. वरातीसाठी तीन तास तर नवरदेव मिरवणुकीसाठी एक तासासाठी घोडा भाडेतत्त्वावर दिला जातो. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात घोड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे नवरदेवांची घोड्यावर बसविण्याची हौस भागविण्यासाठी तासाभरासाठी अडीच ते पाच हजार रुपये वराचे नातेवाईक मोजत आहेत.

“सर्वसाधारण दोन तासांसाठी आम्ही घोडा देतो. त्यासाठी अडीच हजार रुपये आकारले जातात. दीड-दोन महिने आधीच तारखा बूक होत असतात. आम्हा घोडा व्यावसायिकांसाठी लग्नसराई हाच उत्पन्न मिळविण्यासाठी हंगाम असतो. गणपती विसर्जन मिरवणूक, शोभायात्रांसाठी अधून-मधून घोड्यांना मागणी असते. मात्र, हे प्रमाण नगण्य आहे.
– अविनाश काळे-पाटील, घोडे व्यवसायिक, काळेवाडी.

बाहुबली बग्गीला मागणी

वरातीसाठी घोडा बग्गीला वाढती मागणी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. टांग्यासाठी तीन तासांसाठी चार ते आठ हजार रुपये, सिल्वर बग्गीसाठी किमान बारा हजार, रेड पटियालासाठी पंधरा हजार, बाहुबली बग्गीसाठी अठरा हजार तर एसी बग्गीसाठी पंचवीस हजार रुपये दर आकारले जातात. आकर्षक, भव्य दिसणाऱ्या बाहुबली बग्गीला सर्वाधिक मागणी आहे.

घोड्यापेक्षा घोडी महाग

वरातीसाठी घोड्यापेक्षा घोडींना अधिक मागणी असते. घोड्याच्या तुलनेत दिसायला सुंदर असल्यामुळे घोडीसाठी आग्रह धरला जातो. ब्राह्मण, मारवाडी, शीख समाजातील नवरदेवांच्या मिरवणुकीसाठी घोडीचाच वापर केला जातो. घोड्याला दोन तासांसाठी किमान अडीच हजार तर घोडीसाठी किमान साडेचार हजार रुपये आकारले जात असल्याची माहिती घोडे व्यावसायिक अविनाश काळे-पाटील यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.