पिंपरी -एकीएकडे मतदानाची धामधूम सुरु असताना केएसबी चौकातील उड्डाणपुलावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 29) दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. नामदेव ज्ञानोबा भुसनर (वय-28, रा. उंडेआळी, देवाची आळंदी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव हा मूळचा परभणी येथील असून तो एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. सोमवारी दुपारी त्याने उड्डाणपुलावरून उडी मारली. परिसरातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वी तो मयत असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. नामदेवचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्याची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद सुरु होते. त्यामुळे नामदेव हा तणावामध्ये असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.