बावधन, चाकण परिसराला ‘मदती’चा आधार

पोलीस आयुक्‍तालय स्थापित करणार “पोलीस मदत केंद्र’

पिंपरी – गुन्हेगारीचा आलेख व स्वरुप पाहता बावधन व चाकण या परिसरातही पोलीस आयुक्‍तालयाने विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली असून तेथे लवकरच पोलीस मदत केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी निरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये चाकण, रावेत, बावधन, म्हाळुंगे या परिसराचा समावेश असणार आहे.

आयुक्तालय निर्माण करत असताना ग्रामीण पोलीस दलातील पाच पोलीस ठाणे ही आयुक्‍तालयाला जोडण्यात आली. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्याद्वारेच आसपासच्या परिसराचा कारभार पाहिला जात होता. मात्र बावधनसारख्या उच्चभ्रू लोकांचा परिसर व सतत स्थलांतरित कामगारांचा चाकण परिसर येथील वाढती गुन्हेगारी व आव्हाने पाहता पोलीस मदत केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. चाकण पोलिस ठाण्यांत 96 गावांचा समावेश आहे.

म्हाळुंगे हे चाकण पोलीस ठाण्यापासून दूर आहे. तसेच मिश्र लोकवस्ती, औद्योगिकपट्टा, कामगार वसाहत आणि वाढत असलेल्या तक्रारी पाहतो कायदा-सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी या तीनही ठिकाणी मदत केंद्र पुढील काही दिवसांत सुरू केले जाणार आहे. हिंजवडी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या बावधन, देहूरोड पोलिस ठाण्यांतर्गत असलेला रावेत परिसर आणि चाकण पोलिस ठाण्यांतर्गतच्या म्हाळुंगे पट्ट्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाची निर्मिती करतानाच बावधनसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव होता. बावधन परिसरात राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या कंपन्या आहेत. त्याच बरोबर अनेक सनदी अधिकारी या भागात राहतात. उच्चभ्रू लोकवस्ती या भागात असून, महामार्गाला लागून असल्याने गुन्हेगारी वाढली आहे. आयटीपार्क हिंजवडी, तसेच इतर गावांमुळे बावधनकडे लक्ष देण्यास मर्यादा येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

देहूरोड पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या रावेत परिसरात जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून होणारे गुन्हे, वाढणारी लोकसंख्या, स्थानिक आणि बाहेरचा असा वाद देखील बऱ्याचदा येथे उद्‌भवत असतो. व्हाइट कॉलर क्राइम, हाणामारी आणि गावगुंडगिरी या कारणांमुळे येथे मदत केंद्र सुरू करण्यात येत आहे. या मदत केंद्राची नागरिकासोबत पोलिसांना देखील मदत होणार आहे.

“मागणी आणि आवश्‍यकतेचा विचार करता पोलिस मदत केंद्र सुरू केले जाणार असून, निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. तसेच वाहने, कर्मचारी यांची देखील ठराविक याच भागासाठी म्हणून नेमणूक केली जाणार असून, त्याचा नागरिकांना फायदा होणार आहे.
– आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्‍त

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.