पिंपरी-चिंचवड पालिकेचा धन्वंतरीसाठी दोन वर्षांत 30 कोटींचा खर्च

गतवर्षीचा खर्च 21 कोटी रुपये; पावणे बारा कोटींचे देणे बाकी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांवरील वैद्यकीय उपचारासाठी गेल्या दोन वर्षांत 29 कोटी, 86 लाख, 78 हजार 812 रुपये खर्च आला आहे. त्यामध्ये गतवर्षीच्या 2017-18 च्या वैद्यकीय बिलांपोटी 8 कोटी, 8 लाख, 76 हजार 821 रुपये खर्च आला आहे. याशिवाय सद्यस्थितीत एकूण 11 कोटी 85 लाख, 86 हजार 696 रुपयांची बीले विविध रुग्णालयांना अदा करणे बाकी आहे. कर्मचाऱ्यांना आरोग्य वीमा योजना लागू करण्यापूर्वीची ही सर्व बीले अदा करण्याचे महापालिका प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले सादर करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, या योजनेअंतर्गत वाढीव खर्च होऊ लागल्याने, महापालिकेच्या वैद्यकीय धोरणात बदल करण्यात आला. या नवीन वैद्यकीय धोरणांतर्गत 1 सप्टेंबर 2015 पासून महापालिका कर्मचाऱ्यांना धन्वंतरी स्वास्थ योजना लागू करण्यात आली आहे.

धन्वंतरी उपचारांतर्गत पावणे बारा कोटींचे देणे

2017-18 या आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 874 जणांची धन्वंतरी स्वास्थयोजनेअंतर्गत विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. त्यापोटी 8 कोटी 8 लाख 76 हजार, 821 रुपये खर्च आला. तर यंदा 4 हजार 366 जणांवरील उपचारासाठी 21 कोटी, 78 लाख, 1 हजार 991 रुपये खर्च आला आहे. आतापर्यंत एकूण 3 हजार 996 वैद्यकीय बीलांपोटी महापालिकेने एकूण 18 कोटी 9 लाख 2 हजार 116 रुपये विविध रुग्णालयांना अदा केले आहेत. सद्यस्थितीत 2 हजार 244 बीलांपोटी एकूण 11 कोटी 85 लाख, 86 हजार, 696 रुपये अदा करणे बाकी आहे.

महापालिका सेवेतील सुमारे साडे सात हजार कर्मचारी तसेच काही महिन्यांपूर्वी या योजनेत महापालिका सेवेतील शिक्षकांनादेखील सामावून घेण्यात आले आहे. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी यांना देखील ही योजना ऐच्छिक पद्धतीने लागू करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या दहा हजारांपेक्षा अधिक झाली आहे. आरोग्य योजना महागडी ठरल्याने कर्मचारी महासंघासोबत बोलणी करुन प्रत्येक कर्मचाऱ्याला आरोग्य वीमा योजना लागू करण्याचा प्रस्ताव महापालिका महासभेत मंजूर करण्यात आला आहे.

या खर्चाला आळा घालण्यासाठी प्रशासनाला आरोग्य वीमा योजनेसारखी पावले उचलावी लागली आहेत. कर्मचाऱ्यांसाठी वैयक्‍तिक आरोग्य वीमा योजना लागू करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी प्राथमिक बैठक झाली असून, महासभेतदेखील या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेकरिता मेसर्स के. एम. दस्तूर रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि. या एजंटची नेमणूक करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत महापालिका सेवेतील कर्मचाऱ्यांच्या दरमहा वेतनातून 300 रुपयांची कपात केली जात आहे. तर सेवानिवृत्त कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून दरमहा 150 रुपये कपात केली जाते. या योजनेचा लाभ कर्मचारी व त्याची पत्नी अथवा पती यांच्याबरोबरच 18 वर्षांखालील दोन पाल्यांना याचा लाभ घेता येत आहे. त्याकरिता संबंधित विभागाकडून त्या कर्मचाऱ्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. सेवानिवृत्तीनंतरही ही योजना चालू ठेवायची की नाही, याचा निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.