पिंपरी : ‘त्या’ अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी

पिंपरी – महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक शशिकांत पोकळीकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अनाधिकृत बदल्या केल्याचा ठपका ठेवत त्यांचे पुण्यातील कार्यालय सीलबंद केले. त्यांच्यावर कठोर कारवाई करुन त्यांना सेवा निलंबित करावे, अशी मागणी विद्युत जिल्हा सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली आहे.
यासंदर्भात सौंदणकर यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सतीश पराडकर व वाडकर यांच्या तपासणीत पोकळीकर दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे.

महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयातील कार्य अभियंता गौतम गायकवाड, सहाय्यक राजपूत, पवार, अधीक्षक अभियंता वादिराज जहांगीरदार, कार्य अभियंता नेहते यांनी तत्कालीन प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या नावाखाली चुकीचे काम करत कोट्यावधींचा अपहार केला. परिणामी धारावी येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयातील मुख्य तपास आधिकारी पराडकर व वाडकर यांनी पोकळीकर यांच्या कार्यालयाची तपासणी करून कार्यालय सील केले.

पोकळीकर यांनी ताकसांडे यांच्याकडून कोणतीही लेखी परवानगी न घेता नियमबाह्य अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या बदल्यांची माहिती वेबसाईटवर टाकणे बंधनकारक असताना देखील पोकळीकर यांनी आपल्या वैयक्तिक मेल वरुन आदेश पाठवले. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रभारी प्रादेशिक संचालक सचिन तालेवार हे प्रोत्साहन देत आहे, असा आरोप सौंदणकर यांनी केला आहे. सौंदणकर यांनी याबाबतचे निवेदन पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांना पाठवले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.