पिंपरी : एच. ए. मैदानावर डेब्रिज माफियांना मोकळे रान

राजरोसपणे मैदान बळकावले : कारवाई कोण करणार?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एच. ए. कंपनीच्या मैदानावर राजरोसपणे अनधिकृत दगड मातींचा भराव (डेब्रिज) टाकला जात आहे. एचए कंपनी व्यवस्थापनाकडून यावर कारवाई केली जात नाही तर महापालिकेकडून ही बाब आपल्या अखत्यारित नसल्याचे सांगत हात वर केले जात आहे. त्यामुळे डेब्रिज माफियांना याठिकाणी मोकळे रान आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची ओळख असलेल्या एचए कंपनीला आर्थिक ग्रहण लागल्यानंतर कंपनीच्या कर्मचारी व अधिकारी वसाहतीला उतरती कळा लागली. या वसाहतीलगतच कंपनीच्या मालकीची मोकळी जागा आहे. परिसरातील नागरिक या मैदानावर वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतात. तर सुट्टीच्या दिवशी या मैदानावर क्रिकेटचे सामने रंगतात. मात्र, कंपनी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे या मैदानाला कचरा आणि राडारोड्याचे ग्रहण लागले आहे. या दोन्ही मैदानावर अनेक बाभळीसारखी अनेक काटेरी व जंगली झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.

याठिकाणी या झाडांची संख्या अधिक असल्याने दिवसा देखील याठिकाणी जायला कोणी धजावत नाही. मद्यपींचा याठिकाणी वावर असतो. लिंकरोडवरील झोपडपट्टीतील एका सात वर्षाच्या चिमुलकलीचा मृतदेह याठिकाणी आणून टाकला होता. याशिवाय वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे याच परिसरात खून झाले आहेत. रात्री या मैदानातून जाण्यास नागरिक धजावत नाहीत. रात्रीच्या वेळी प्रेमी युगुलांचे चाळे सुरू असतात.

गेल्या काही वर्षांपासून या मैदानावर डेब्रिज आणून टाकण्याचे प्रकार वाढले आहे. रात्री अंधारात डेब्रिजच्या गाड्‌या खाली केल्या जातात. त्यामुळे आतापर्यंत शेकडो टन राडारोडा या मैदानावर जमा झाला आहे. कंपनी व्यवस्थापनाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने याला अटकाव केला जात नाही. हे मैदान एच. ए. कंपनीच्या मालकीचे असल्याने महापालिका याठिकाणी कारवाई करीत नाही. त्यामुळे आता या मैदानावर राडारोड्याचे उंचच उंच डोंगर तयार झाले आहेत. डेब्रिज टाकणाऱ्यांविरोधात एच. ए. कंपनीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, डेब्रिज माफिया पोलिसांच्या हाती लागत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

“एच. ए. कंपनीच्या मालकीच्या मैदानावर बेकायदेशीरपणे डेब्रिज टाकण्यात येत आहे. कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी काही जणांना रंगेहात पकडून कारवाई देखील केली होती. मात्र, आता पुन्हा प्रकार वाढले आहेत. सुरक्षा रक्षक याठिकाणी गस्त घालतात. त्यांची पाठ फिरली की डेब्रिज टाकले जाते. महापालिकेलाही याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

-श्रीकांत दळवी, सुरक्षा अधिकारी, एच.ए.कंपनी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.