रुग्ण अन्‌ रुग्णालयांमध्ये समन्वयासाठी ‘आरोग्य मित्र’

वेळेत उपचारासाठी मदत करणार ः शहरातील विविध आरोग्य, सामाजिक संघटनांचा उपक्रमासाठी पुढाकार

पिंपरी – रस्ते अपघातात योग्यवेळी रुग्णालयात पोहचायला विलंब होत असल्याने आणि तातडीने उपचार मिळत नसल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने जीवनावर बेतू शकते. आता अपघातात जखमी झालेल्यांना योग्यवेळी रुग्णालयात पोहचविण्यासाठी “आरोग्य मित्र’ मदत करणार आहेत.

पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, भावसार व्हिजन इंडिया, लोकमान्य रुग्णालय, रोशनी, कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन या संस्थांनी “आरोग्य मित्र’ हा स्तुत्य उपक्रम सुरु केला असून या उपक्रमाचा आज (रविवारी) जागतिक आरोग्य दिनाचे निमित्त साधत महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच) रुग्णालयात उपक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यातील धर्मादाय आयुक्तलयातील अधिक्षक अभिजीत आनप होते. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. दिलीप कानडे, लोकमान्य रुग्णालयाचे डॉ. आशिष सूर्यवंशी, निमाचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

रुग्ण, रुग्णालय अन्‌ डॉक्‍टरांमध्ये समन्वय, दुवा साधण्याचे काम आरोग्य मित्र करणार आहेत. त्याचबरोबर केंद्र, राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांची जनजागृती करणार आहेत. उपचारासाठी कोठून आणि कशी मदत मिळवायची याबाबत देखील रुग्णांना माहिती दिली जाणार आहे. त्यांना लोकमान्य रुग्णालयात सहा महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर योग्यता तपासण्यात येईल. त्यानंतर आरोग्य मित्राचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. रस्ते अपघातातील जखमींना व्यवस्थित हाताळून योग्यवेळी रुग्णालयात पोहचविण्याचे काम आरोग्य मित्र करणार असून हृदयविकार, छातीत दुखणे, मधुमेह याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

डॉ. आशिष सूर्यवंशी, लक्ष्मीकांत भावसार यांनी मार्गदर्शन केले. लायन्स कल्बचे डॉ. ललित धोका, महापालिकेच्या महिला आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा डांगे, कसबा गणपतीच्या विश्‍वस्त संगीता ठक्कार, भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचे विश्‍वस्त संजीव जावळे, पिंपरी-चिंचवड नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा सविता निगडे, उज्जवला केळकर, डॉ. मोहन गायकवाड यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अभय कुलकर्णी यांनी केले. तर, गणेश जवळकर यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.