पिंपरी : महापालिकेच्यावतीने शहरात शंभर नागरी सुविधा केंद्र स्थापन्याचा मानस

शहरात नव्याने 49 केंद्र होणार : प्रत्येक प्रभागात तीन केंद्र विचाराधीन

पिंपरी -विविध कामांसाठी आवश्‍यक असलेले दाखले नागरिकांना त्यांच्या जवळच्या परिसरातच उपलब्ध व्हावेत, याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरी सुविधा केंद्र वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. शहरात नव्याने 49 केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याने या केंद्रांची संख्या 100 वर पोचणार आहे.

नागरिकांना देय असलेले दाखले, परवाने नगररचना, झोनिपू, उद्यान, करसंकलन, वैद्यकीय बांधकाम परवानगी, अग्निशामक, आकाशचिन्ह परवाना, पाणी पुरवठा व जलनि:सारण या विभागातून नागरिकांना विहीत मुदतीत दिले जातात. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या या विविध सुविधा व दाखले नागरिकांना तत्परतेने उपलब्ध व्हावेत, याकरिता शहराच्या विविध भागांमध्ये एकूण तीन टप्प्यांमध्ये सध्या एकूण 49 नागरी सुविधा केंद्र सुरू आहेत.

शहराची लोकसंख्या 22 लाखांवर असून, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, महापालिकेच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन प्रभाग रचनेनुसार सर्व निवडणूक प्रभागांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येकी तीन ते चार नागरी सुविधा केंद्र स्थापन करण्याचे महापालिकेचे धोरण आहे. त्यानुसार शहरातील एकूण 49 खासगी केंद्रांव्यतिरिक्‍त शहराच्या अन्य भागांमध्ये एकूण 49 केंद्र नव्याने सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

“महापालिकेच्या वतीने नागरी सुविधा केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या घरापासून जवळच महत्वाचे दाखले उपलब्ध व्हावेत, ही त्यामागची भूमिका आहे. त्यामुळे अन्य नागरी सुविधांवर पडणारा ताण कमी होणार आहे.
– नीळकंठ पोमण ,मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका

या नागरी सुविधा केंद्रसाठी महापालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील एकाच व्यक्‍तिच्या नावे अर्ज करता येणार आहे. त्याकरिता संबंधित अर्जदार अथवा कुटूंबाचे बांधकाम अधिकृत असणे आवश्‍यक आहे. तशी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. त्याकरिता 15 एप्रिल दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

नागरी सुविधा केंद्रासाठी आवश्‍यक बाबी…

-केंद्रासाठी किमान कारपेट एरिया 180 फूट किंवा त्यापेक्षा जास्त नसावा.
-पन्नास हजार रुपये अनामत रक्कम
-दोन नागरी सुविधा केंद्रांमध्ये किमान एक किलोमीटर अंतर असावे.
-हे केंद्र अन्य व्यक्‍तिच्या नावे स्थानांतर करता येणार नाही.
-बैठक व्यवस्था, कर्मचारी व अन्य सोयी सुविधा पुरविणे केंद्र
चालकाची जबाबदारी
-एका केंद्रासाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी पद्धतीने केंद्राचे वाटप

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.