उन्हाचा आरोग्यावर परिणाम; उष्माघाताचे रुग्ण वाढले

पिंपरी – यंदा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. मार्च महिन्यातच तापमानाने चाळिशी ओलांडली. यंदा लवकर तीव्र झालेल्या उन्हाळ्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर जाणवू लागला आहे. उन्हामुळे आजारी पडलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.

राज्यभरात उष्माघाताचे रुग्ण साधारणपणे एप्रिल, मे व जून महिन्यात आढळतात. मात्र, यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभरात उष्णाघाताचे रुग्ण आढळल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी मार्च व एप्रिल महिन्यातच राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाची चाळीशी पार केली असल्याने उष्णतेने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसत आहे.

उष्णतेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे जिकरीचे झाले आहे. तसेच, वाढत्या उन्हामुळे अबालवृद्ध त्रस्त झाले आहेत. सध्याची उष्णतेची तीव्रता पाहता महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. वाढत्या उन्हाचा आरोग्यावर परिणाम होत आहे.

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने दुपारच्या वेळेस बाजारपेठेतील गर्दी कमी होत आहे. परंतु, शहरातील ज्यूस सेंटर, रसवंती गृह, आईस्क्रीमच्या दुकानांध्ये गर्दी वाढत आहे. त्याबरोबरच, फळांच्या खरेदीवरही अनेकांनी भर दिला आहे. उन्हाळ्यामध्ये उपयुक्‍त अशा कलिंगड, टरबूजांच्या दुकानांची संख्या वाढली आहे.

“उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. उष्माघाताचा रुग्ण दाखल झाल्यास त्यांना थंड पाण्याची आंघोळ घालून फॅनखाली अथवा वातानुकूलित ठिकाणी ठेवले जाते. नागरिकांनी उष्माघातापासून सुरक्षित राहण्यासाठी मुबलक पाणी पिण्याची आवश्‍यकता आहे
– डॉ. शंकर जाधव, उपवैद्यकीय अधिकारी, वायसीएम रुग्णालय

प्रतिबंधात्मक उपाय

– उन्हात बाहेर जाताना चेहऱ्यावर ओल्या कपड्यांचा वापर करा
– नागरिकांनी सकाळी 11 ते 3 या वेळेत बाहेर जाणे टाळावे
– लस्सी, ताक व मुबलक प्रमाणात पाणी प्यावे.
– डोळ्यावर गॉगल, डोक्‍याला टोपी व तोंडाला रुमाल बांधावा
– भडक रंगाचे कपडे न वापरता सुती कपडे वापरावे
– कलिंगड, द्राक्षे, टरबूज ही फळे जास्त खावीत.

उष्माघाताची लक्षणे

अंग गरम होणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, थकवा जाणवणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे, जुलाब होणे यासारखे प्रकार उष्माघाताचे आढळतात. तसेच, उष्माघाताचा धोका गरोदर माता, मधुमेह, ह्रदयविकार व व्यसन करणाऱ्या व्यक्‍तींना जास्त प्रमाणात जाणवतो. अशा प्रकारची लक्षणे जाणवल्यास तातडीने आवश्‍यक उपाययोजना करावी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.