पिंपरी : भुयारी मार्गालगत वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

कारवाईची मागणी : पायी चालणेदेखील झाले मुश्‍किल, रोजचाच त्रास

पिंपरी – पिंपरी येथे लोहमार्ग ओलांडण्यासाठी उभारलेल्या भुयारी मार्गाला अनधिकृत वाहनतळाचा विळखा पडला आहे. या अरुंद रस्त्यावर दुतर्फा चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे याठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे नागरिकांना पायी चालणे देखील मुश्‍किल होत आहे. वाहतूक शाखेने या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहरातील पिंपरी ही मुख्य बाजारपेठ आहे. साई चौकात असलेल्या चौपाटीमुळे याठिकाणी खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी कायम गर्दी व्हायची. मात्र, महापालिकेने याठिकाणी भुयारी मार्ग काढून थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर येण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करुन दिला. त्यामुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते. या भुयारी मार्गातून अवजड वाहने जाऊ शकत नाहीत. हे करत असतानाच चौपाटीला भेट देणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने या चौपाटीचे भुयारी मार्गाशेजारी लोहमर्गालगत स्थलांतर केले आहे.

चारचाकीचे पार्किंग

दरम्यान, पिंपरी भाजी मंडईलगत असलेले वाहनतळ अपुरे पडत असल्याने खरेदीसाठी पिंपरी कॅम्पात येणारे अनेक चालक आपले चारचाकी वाहन भुयारी मार्गालगत असलेल्या अरुंद रस्त्यावर उभी करतात. त्यातच चौपाटीला येणाऱ्या खवय्यांच्या वाहनांचीदेखील भर पडते. याशिवाय भुयारी मार्गालगत हातगाडीवर बर्फ व ज्युसविक्रीचा व्यवसाय केला जातो. याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांमुळेदेखील वाहतूक कोंडीत भर पडते. साई चौकातील नो पार्किंगमधील वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. मात्र, केवळ 40 फुटांचा भुयारी मार्ग ओलांडून, अरुंद रस्त्यावर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांकडे वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष केले जाते. या ठिकाणी देखील वाहनांवर कारवाई करण्यात यावी आणि रोज होत असलेली वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

“पिंपरी कॅम्पात एकूण 120 मोबाईल विक्रीची दुकाने आहेत. मोबाईलबरोबरच अन्य वस्तू खरेदीसासाठी येणाऱ्या ग्राहकांना कॅम्प व परिसरात चारचाकी वाहने लावण्यास मनाई आहे. त्यामुळे डाल्को कंपनीच्या मोकळ्या भूखंडावर वाहतनतळ उपलब्ध करुन देण्याची पोलीस आयुक्‍तांकडे मागणी केली आहे. या मागणीची अंमलबजावणी झाल्यास, वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटू शकतो.
– डब्बू आसवानी, ,नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महापालिका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.