पाचशे बोरूंनी केली अकराशे पानांची गाथा हस्ताक्षरीत

वकिलाचा अनोखा ध्यास : तुकोबांच्या चरणी अभंग गाथेचे समर्पण, साहित्य संग्रलयात देवस्थानकडून समावेश

पिंपरी – मराठी सारस्वतांचे वैभव असलेली संत तुकाराम महाराजांची गाथा एका वकिलाने चक्क बोरुच्या सहाय्याने लिहून काढली आहे. त्यासाठी पाचशे बोरुंचा वापर करण्यात आला. अकराशे पानांच्या या बोरु लिखित गाथेचे नुकतेच देहुतील मंदिरात समर्पण करण्यात आले. मकरंद वामन गोखले असे या वकिलाचे नाव आहे.

पिंपरीतील संत तुकारामनगर येथे राहणारे ऍड. मकरंद गोखले यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची दखल देहू संस्थानने घेतली आहे. ही गाथा संत तुकाराम महाराजांच्या साहित्य संग्रहालयात नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. ऍड. गोखले यांनी 2014 व 2015 साली दोनदा श्री गुरुचरित्र बॉल पेनने लिहून काढले होते. त्यावेळी त्यांना एका गुरुदेव भक्ताने गुरुचरित्र बोरुच्या सहाय्याने लिहिण्याचे सुचविले. मात्र, ऍड. गोखले यांनी यापूर्वी कधीही बोरु हातात धरला नव्हता. त्याचा कसा वापर करायचा हे त्यांना माहिती नव्हते.

काळेवाडीतील ज्येष्ठ विधीज्ञ दिनकर लाळगे पाटील यांनी त्यांना बोरुने कसे लिहायचे ते शिकविले. त्यानंतर ऍड. गोखले यांनी सातशे पानांचे श्री गुरुचरित्र लिहिले. त्यानंतर दासबोध हा ग्रंथ बोरुच्या सहाय्याने लिहिला. 500 पानांचे हे लिखाण झाले. त्यातून त्यांचा बोरुने लिहिण्याचा आत्मविश्‍वास वाढला. बोरुचे अग्रटोक कसे ठेवावे, शाई कशी वापरावी याचा अंदाज आला. त्यानंतर त्यांनी तुकोबांची अभंग गाथा बोरुने लिहून काढण्याचे ठरविले.

वै. जोग महाराज सांप्रदायकी ह. भ. प. देवडीकर यांचे (पारायण पद्धतीप्रमाणे) छापील पुस्तक त्यांनी बोरुने हस्ताक्षरीत केले. बोरुने लिहिताना शब्द चुकला तर तो खोडता येत नाही. तसेच झटपट लिहिता देखील येत नाही. त्यामुळे अचूक लिहिण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. तुकाराम बीजेचा योग साधून 26 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांनी गाथा बोरुने हस्ताक्षरीत करण्यात सुरूवात केली. तब्बल पाचशे बोरु वापराव्या लागल्या.

बोरु पुण्यात एकाच ठिकाणी मिळतात. त्याला देखील मुबलक प्रमाणात नसल्याने खराब बोरुचा पुनःवापर करुन गाथा पुर्ण केली. यामध्ये तब्बल सहा महिन्यांचा काळ गेला. अकराशे पानांची ही गाथा तयार झाली आहे. देहू देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब मोरे, सुनील मोरे यांनी या कामासाठी मदत केल्याचे ऍड. गोखले यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.