पिंपरी : पवना प्रदूषणाबाबत पाच लाखांची बॅंक गॅरंटी द्या!

प्रदूषण नियंत्रण मंडळाची महापालिकेला नोटीस

पिंपरी  – पवना नदीत घरगुती सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे उघडकीस आल्यानंतर याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाच लाखांची बॅंक गॅरंटी देण्याची नोटीस बजावली आहे.

पवना नदीवर थेरगाव येथे असलेल्या केजुबाई बंधाऱ्यात दीड महिन्यापूर्वी मासे मृतावस्थेत आढळले होते. नाल्यातून रसायन मिश्रित पाण्यामुळे मासे मेल्याचा संशय व्यक्‍त केला जात होता. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला 27 फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. सात मार्च रोजी त्यावर सुनावणी घेण्यात आली. पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्‍त पाहणी केली असता पाच ठिकाणी घरगुती सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे आढळले.

नदीपात्रात थेट पद्धतीने सोडण्यात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी, त्याची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडेकर यांनी महापालिकेला पाच लाखांची बॅंक गॅरंटी देण्याबाबत नोटीस बजावली आहे.

“सांडपाणी नदीत सोडण्यात येऊ नये, यासाठी उपाययोजना केल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस अद्यापपर्यंत प्राप्त झाली नाही.
-मकरंद निकम, सहशहर अभियंता, महापालिका

Leave A Reply

Your email address will not be published.