पिंपळे गुरव येथे 11 लाखांची विदेशी बनावट दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई

पिंपरी -पिंपळे गुरव येथून राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने तब्बल 11 लाख 39 हजार 500 रुपये किंमतीचे विदेशी मद्य जप्त केले आहे. ही कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आली आहे. नागा डाया चावडा (वय-35 रा. पिंपळे गुरव) असे अटक आरोपीचे नाव आहे. तपासी पथकाने दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अवैध बनावट “स्कॉच’ या विदेशी मद्याची वाहतूक व विक्री होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पिंपळे गुरव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र येथे सापळा रचून चावडा याला ताब्यात घेतले.

आरोपीच्या दुचाकीची झडती घेतली असता त्यामध्ये 1 लीटर क्षमतेच्या दोन सिलबंद बॉटल मिळाल्या. या बनावट असल्याचा संशय पथकाला आला. त्यावरून त्याच्याकडे चौकशी केली असता ती बनावट असल्याचे उघड झाले. त्यानुसार अधिक तपास केला असता त्याने रिकाम्या बॉटलमध्ये बनावट स्कॉच भरून त्या विकत असल्याचे सांगितले. या कारवाईत पोलिसांनी विविध ब्रॅन्डच्या प्रत्येक एक लिटर क्षमतेच्या 67 भरलेल्या बाटल्या तसेच 500 रिकाम्या बाटल्या, 2 हजार बुचे, 260 लेबल, 950 कव्हर, असा एकूण 11 लाख 39 हजार 500 रुपयांचा एवज जप्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शुल्क विभागाचे भरारी पथक अवैध दारु वाहतूक व विक्री यांच्यावर धडक कारवाई करत आहे. पुढील तपास एस.आर. दाबेराव हे करीत आहेत. ही कारवाई, मुख्य निरीक्षक ए.बी.पवार, उपनिरीक्षक एस.आर. दाबेराव, सचिन भवंड, दत्ता गवारी, जवान स्वप्निल दरेकर, महेंद्र कदम, प्रिया चंदनशिवे, शशांक झिंगळे यांनी केली. यावेळी पथकाने सरकारमान्य दुकानातूच मद्य खरेदी करा, परवान्या शिवाय मद्य खरेदी करु नका, अशा प्रकारे अवैध मद्य विक्री होत असल्यास त्वरीत पोलिसांना किंवा राज्य उत्पादन शुल्काला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.