कॉपी पेस्ट अहवालावर भर
पिंपरी -गेल्या वर्षभरापासून करोना शहरात ठाण मांडून बसला आहे. तरी अजूनही पिंपरी-चिंचवड महापालिकेला करोनाबाधित आणि करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्यांमध्ये बिनचूकपणा साधता आलेला नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करोना परिस्थितीबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले जाते. या पत्रकातील आकडेवारीमध्ये सातत्याने गोंधळ होत असल्याचे समोर आले आहे. तर अनेकवेळा मागचे आकडे पुढे पेस्ट करून प्रसिद्धीपत्रक जारी केले जात आहे. त्यामुळे अचूक माहिती मिळण्यास अडचणी येत आहेत. एवढ्या गंभीर आजाराबाबत पालिका प्रशासनाच्या या निष्काळजीपणाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दररोज किती रुग्ण बाधित आले, किती जणांचा मृत्यू झाला व चाचण्या किती केल्या याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले जाते. त्यामधून शहरातील नागरिकांना करोनाची परिस्थिती काय आहे याबाबत माहिती मिळत असते. मात्र, यामध्ये सातत्याने चुका केल्या जात आहेत. चार दिवसापूर्वी प्रभागानुसार रुग्णांची आकडेवारी आदल्या दिवशीचीच कॉपी-पेस्ट करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी रुग्णांची संख्या घटली होती. मात्र तरीही वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून आदल्या दिवशीची प्रभागानुसारची आकडेवारी देण्यात आली. साधे त्यांची बेरीज करण्याचीही तसदी कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. तर मंगळवारी शहराबाहेरील मृतांची संख्या 914 होती. आज 19 मृत्यूंची भर पडली. मात्र तरीही शहराबाहेरील एकूण मृतांची संख्या ही 914 च दाखविण्यात आली होती.
डॅशबोर्ड अपडेट नाही
शहरातील खासगी रुग्णालयात करोनासाठी कोणते व किती बेड शिल्लक आहेत. याबाबत माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेच्या डॅशबोर्डवर नोंद करणे आवश्यक आहे. असे असताना खासगी रुग्णालय प्रशासन यामध्ये टाळाटाळ करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. बेडची माहिती अद्यावत केली जात नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बेडबाबत माहिती मिळत नाही. मात्र असे असतना पालिका प्रशासन मात्र ढिम्म आहे. याबाबत दोनदा कारवाईचे आदेश काढण्यात आले, मात्र खासगी रुग्णालय प्रशासनांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
रोज तीच टीप
शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामध्येच आता मृतांचा आलेख उंचावू लागला आहे. त्यामुळे शहरवासियांना धडकी भरली आहे. असे असताना पालिका प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्याचे वारंवार समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पत्रकात एकच टीप असते. ज्यात मागे झालेले मृत्यू आज नोंदवून आल्याचे सांगितले जाते. हा प्रकार तब्बल पंधरा दिवसांपासून सुरू आहे. यावर पालिका प्रशासन खासगी रुग्णालयातील मृतांची नोंद उशिरा होत असल्याचे स्पष्टीकरण देत आहे. यावरून पालिका प्रशासनाचे करोना मृत्यूबाबतही खासगी रुग्णालयांवर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे रुग्ण, मृत्यू, संशयित यांचे योग्य आकडे देण्याऐवजी मागील आकडे कॉपी पेस्ट केले जात आहेत. या ढिसाळ कारभारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.