पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘सांगली पॅटर्न’चे दावे ठरले फोल

सदस्य फोडण्यात अपयश : भाजपने जिंकले स्थायी अध्यक्षपद


स्थायी समितीच्या अध्यक्षपदी ऍड. नितीन लांडगे

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत कलहाचा फायदा घेत सांगली पॅटर्न पिंपरी-चिंचवडमध्येही राबवू, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी करत होते. परंतु त्यांचे दावे वल्गना ठरल्या आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक भाजपने अगदी सहजरित्या जिंकली. निवडणूक जिंकली असली तरी आपल्या नाराज नगरसेवकाला निवडणुकीसाठी आणण्यात भाजपही सपशेल अपयशी ठरले.

स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचे सदस्य फोडून सांगली पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने केला होता. मात्र सत्ताधारी भाजपने गृहकलह शांत करत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले आहे. अत्यंत चुरशीच्या या लढतीमध्ये भोसरीकरांनी स्थायीवर वर्चस्व मिळविले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक ऍड नितीन लांडगे यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये भाजपकडून भोसरीचे ऍड नितीन लांडगे यांनी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रवीण भालेकर यांना रिंगणात उतरवले. स्थायी सभापती पदाची संधी न मिळाल्याने भाजपचे नगरसेवक यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.

तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शत्रुघ्न काटे इच्छुक होते. याच परिस्थितीचा फायदा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला खिंडीत पकडण्याचा डाव रचला. त्यासाठी शहरामध्ये सांगली पॅटर्न राबविण्याचा घाट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घातला. त्यानुसार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सातत्याने नाराज सदस्यांच्या संपर्कात होते.

भाजप निष्ठावान कार्यकर्त्यांना पदापासून दूर ठेवत आहे. त्यांना फक्त राष्ट्रवादी पक्षामध्येच न्याय मिळेल, असा दावा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. भाजपमधील नाराज व इच्छुकांना जोडीला घेत स्थायी समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचा उमेदवार बसवायचा, यासाठी नेत्यांनी मेहनत घेतली. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही कानावर घालण्यात आली. मात्र शहरातील दोन कारभारी आमदार लक्ष्मण जगताप व आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी हा कलह शांत केला. त्यामुळे भाजपच्या बाजूने निकाल लागत स्थायीचे सभापतीपद पुन्हा एकदा भोसरीला मिळाले.

गाजावाजा नडला
सांगलीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपमध्ये फूट पाडली. यामध्ये त्यांनी प्रचंड गोपनीयता पाळली होती. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत थोडीही भनक त्यांनी लागून दिली नाही. त्याचीच परिणिती म्हणून सांगली महापालिकेमध्ये सत्तांतर होत राष्ट्रवादीची सत्ता आली. महापालिकेतील स्थायी समिती सभापतीच्या निवणुकीमध्येही सांगली पॅटर्न राबविणार असल्याची जोरदार चर्चा राष्ट्रवादीने घडवून आणली. अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा उघड-उघड दावा केला. त्यामुळे सतर्क झालेल्या भाजपने आपल्या नगरसेवकांना जोडून ठेवण्यात यश मिळवले. हीच बाब राष्ट्रवादीने शांततेत केली असती तर कदाचित यश मिळाले असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रवादी व भाजपची बंद दाराआड चर्चा
महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात दुपारी बारा वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली. अर्ज मागे घेण्यासाठी सदस्यांना 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला. यावेळेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात जाऊन बंद दाराआड सुमारे दहा मिनिटे चर्चा केली.

यावेळी भाजपचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, मावळते सभापती संतोष लोंढे, उपमहापौर केशव घोळवे, नगरसेवक एकनाथ पवार नगरसेविका सीमा सावळे, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका वैशाली घोडेकर आदी उपस्थित होते. यावेळी माघार घेण्याबाबत चर्चा झाली. ज्ञानेश्‍वर लांडगे हे शहराचे पहिले महापौर आहेत. त्यांच्या मुलाला स्थायी समितीवर संधी मिळू द्या, त्यासाठी तुम्ही माघार घ्या अशी विनंती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली असल्याचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या दोन्ही आमदारांनी माझ्यावर विश्‍वास ठेवून ही जबाबदारी दिली आहे. त्यांचा विश्‍वास सार्थकी लावणार आहे. निवडणुकीसाठीही पदाधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. मी त्यांचाही आभारी आहे.
– ऍड. नितीन लांडगे, स्थायी समिती सभापती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.