पिंपरी-चिंचवड महापालिकेला द्यावी लागणार बांधकाम प्लॅन मंजुरीची प्रत

बांधकाम कामगार नोंदणीसाठी कामगार विभागाचे महापालिकांना पत्र

पिंपरी – विविध योजना राबवूनही बांधकाम कामगारांची नोंदणी हव्या त्या गतीने होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसह विशेष प्राधिकरणांच्या हद्दीत सुरु असलेल्या बांधकाम आराखडा मंजुरी प्रत व कार्यआदेशाची प्रत बांधकाम कामगार कल्याण मंडळाला उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. या माहितीवरुन बांधकाम काम करणाऱ्या आस्थापना आणि बांधकामगार कामगारांची नोंदणी केली जाणार आहे.

बांधकाम कामगार व त्यांच्या पाल्यांकरिता विधि कल्याणकारी योजना राबविण्यासाठी राज्य सरकारने कामगार विभागाच्या अखत्यारित महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व विशेष प्राधिकरणांच्या हद्दीत सुरु असलेल्या बांधकामांकडून आकारला जाणारा एक टक्का उपकर या मंडळाकडे जमा केला जातो. या माध्यमातून सुमारे सात हजार कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. या निधीतून बांधकाम कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.

मंडळाकडे कोट्यवधी रुपयांचा निधी पडून असला, तरीदेखील लाभ देण्यासाठी या घटकाची नोंदणी करणे आवश्‍यक आहे. कामगार विभागाकडे असलेले मनुष्यबळ अपुरे असल्याने नोंदणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, बांधकाम कामगारांची नोंदणी जलदगतीने व्हावी, याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याला नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत केले असतानाही नोंदणीचे आवश्‍यक लक्ष्य गाठता आलेले नाही. त्यामुळे कल्याणकारी योजना राबविताना अनेक मर्यादा येत आहेत.

बांधकाम करणाऱ्या आस्थापनांनी बांधकाम सुरु केल्यानंतर साठ दिवसांच्या आत राज्य सरकारच्या महा ऑनलाइन या संगणक प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, याकडे बांधकाम आस्थापने दुर्लक्ष करीत आहेत. तर दुसरीकडे बांधकाम कामगारांची नोंदणीदेखील रोडावली आहे. या दोन्ही बाबींवर लक्ष केंद्रीत करताना स्थानिक स्वराज्य संस्था व विशेष प्राधिकरणांच्या हद्दीत सुरु असलेल्या बांधकाम आराखडा मंजुरी प्रत व कार्यआदेशाची प्रत बांधकाम कामगार कल्याण मंडळाला उपलब्ध करुन देण्याचे आदेश कामगार विभागाचे सहसचिव शशांक साठे यांनी दिले आहेत.

बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी कामगार विभागाने आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, त्याला फारसे यश आलेले नाही. त्यामुळे आता या माध्यमातून प्रभावीपणे नोंदणी प्रक्रिया राबवावी.
– जयंत शिंदे, अध्यक्ष, बांधकाम कामगार सेना

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.