- चार आयएएस अधिकारी स्पर्धेत; पाटील यांच्या निवडीची चर्चा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली जवळपास निश्चित झाली असून, आठवडाभरात महापालिकेला नवीन आयुक्त मिळणार आहेत. पिंपरी-चिंचवडला आयुक्त म्हणून येण्यासाठी चार आयएएस उत्सुक असले तरी राजेश पाटील यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर यांनी साडेतीन वर्षांपूर्वी कारभार हाती घेतला होता. गतवर्षी मार्चमध्येच त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. मात्र, अचानकपणे निर्माण झालेल्या कोविडच्या संकटामुळे त्यांची बदली करण्यात आली नव्हती. 2 जानेवारी 2021 रोजी त्यांची पदोन्नतीही झाली. मात्र आहे त्याच पदावर त्यांची पदस्थापना करण्यात आली होती. बदलीसाठी स्वत: हर्डीकर हेच महिनाभरापासून आग्रही असल्याचे बोलले जात आहे. 27 जानेवारीपासून हर्डीकर हे रजेवर असून, त्यांनी मुंबईत ठाण मांडून बदलीसाठी प्रयत्न चालविल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका स्तरावर पुन्हा आयुक्तांच्या बदलीची चर्चा रंगली आहे.
हर्डीकर हे 4 फेब्रुवारीपर्यंत सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या बदलीची चर्चा जोमात सुरू आहे. सव्वा वर्षापूर्वीच राज्यामध्ये भाजपची सत्ता जाऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्या वेळेस आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, आयुक्त हर्डीकर यांनी सत्तेतील पुढाऱ्यांशी जुळवून घेतल्याने तसेच करोनाकाळात चांगली कामगिरी केल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर मागील महिन्यामध्ये त्यांना बढती मिळाली. या बढतीच्या वेळी त्यांची बदली होऊन दुसरे अधिकारी पालिकेचे कारभारी होतील अशी चर्चा रंगली होती. ती देखील फोल ठरली होती. त्यानंतर आता आयुक्त आठ दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. ते सुट्टीवर जाताच शहरामध्ये त्यांच्या बदलीच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. तर त्यांच्या नंतर पालिकेच्या आयुक्तपदी कोण येणार याचीही चर्चा रंगली आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली झाल्यास चार नावे चर्चेत आहेत. आयुक्त हर्डीकर यांच्या जागेवर ओडिसाचे राजेश पाटील, रूबल अग्रवाल, म्हाडाचे योगेश म्हसे व सुहास दिवसे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. सद्यःस्थितीत आयुक्तांचा कार्यभार सुहास दिवसे यांच्याकडे आहे.
राजेश पाटील यांची चर्चा
ओडिसामध्ये प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय काम करणारे राजेश पाटील यांची बदली महाराष्ट्रात झाली असून, त्यांच्याकडे अद्यापपर्यंत कोणताच पदभार देण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासू म्हणून पाटील यांची ओळख आहे. त्यामुळे सध्या त्यांचे नाव आघाडीवर आहे. राजेश पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत.
हर्डीकर आणि वाद
राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर श्रावण हर्डीकर यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेतल्यानंतर त्यांचे स्थानिक कारभाऱ्यांशी असलेले संबंध बिघडले. यानंतर आयुक्तांच्या विरोधात अनेकवेळा पत्रकबाजीही झाली. स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येत आयुक्तांनी गेल्या वर्षभरात अनेक चुकीचे निर्णय घेतल्यामुळे हर्डीकर यांच्या नावासोबत आता वादही जोडला गेला आहे. रस्ते साफसफाई, गॅस पाईपलाईन, कोविड, निविदा प्रक्रियेतील राजकीय दबावातून घेतलेल्या निर्णयासह त्यांचे अनेक निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय अंगलट येण्याची शक्यता असल्याने त्यांनीही आता बदलीसाठी स्वत:च पुढाकार घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.