पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी चिंचवड, ऑटो क्लस्टर समोरील सात एकर जागेवर पर्यावरणपूरक 13 मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 312 कोटी 20 लाख 32 हजार 838 रुपये खर्चाची निविदा मे महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने तीनवेळा मुदतवाढ दिली होती. दिलेल्या मुदतीत पाच कंत्राटदारांनी निविदा सादर केली आहे. त्यापैकी तीन कंत्राटदार अपात्र ठरले असून केएमव्ही प्रोजेक्ट हैदराबाद आणि बी.जी शिर्के यांची निविदा पात्र झाली आहे. केएमव्ही प्रोजेक्ट हैदराबाद या कंत्राटदाराने 8.50 टक्के कमी दराने निविदा सादर केल्याने या कंत्रादारास इमारत बांधण्याचे काम दिले जाण्याची शक्यता आहे.
पिंपरी येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर महापालिकेची प्रशासकीय इमारत आहे. या चार मजली इमारतीचे तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्या हस्ते 13 मार्च 1987 रोजी उद्घाटन झाले होते. तीन मजल्यावर अधिकाऱ्यांची दालने तर, एका मजल्यावर पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. त्यानंतर महापालिकेचे विस्तारीकरण करण्यात आले. सध्या ही जागा अपुरी पडत आहे. अनेक विभागांची कार्यालये मुख्यालयातून इतर इमारतींमध्ये स्थलांतरित केली आहेत. पालिकेतील अधिकारी, नगरसेवकांची वाहने पार्क करण्यासाठी वाहनतळाची जागा अपुरी पडते. महापालिकेत नोकर भरतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित असून ही भरती (पान 3 पहा)8
प्रशस्त इमारत अन् हेलिपॅड!
महापालिकेची चिंचवड स्टेशन या ठिकाणी 35 एकर जागा आहे. त्यापैकी 7 एकर जागेत 13 मजली प्रशस्त पर्यावरणपूरक इमारत उभारण्याचे नियोजन आहे. भविष्यातील 50 वर्षांचे नियोजन करून या इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध विभागासह पदाधिकाऱ्यांची दालने असतील. प्रशस्त सभागृह, मीटिंग हॉल, कॅण्टीन, स्वच्छतागृह आणि इतर सोयी असतील. उर्वरित जागेत सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. पाच मजली स्वतंत्र इमारतीमध्ये वाहनतळ असणार आहे. त्यात 500 मोटारी आणि दीड हजार दुचाकी पार्क करता येणार आहेत. तर, महापालिका सभागृहात 300 नगरसेवकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असणार आहे. इमारतीच्या गच्चीवर हेलिपॅड असणार आहे.