उत्पन्न निम्म्यावर; सर्व भार बांधकाम, करसंकलन विभागावर
पिंपरी – करोना विषाणूच्या संक्रमणामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीचा ओघ घटला असून गत वर्षीच्या तुलनेत गेल्या चार महिन्यांत उत्पन्न निम्म्यावर आले आहे. एका बाजूला उत्पनाचे स्त्रोत कमी झाले आहेत, तर दुसरीकडे वैद्यकीय व आरोग्य सेवेवरील खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अनेक मोठे प्रकल्प रद्द केले असले तरी आगामी काळात महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या अनुषंगानेच महापालिकेमध्ये महापौर व स्थायी समिती अध्यक्षांच्या उपस्थित सर्व विभागप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विभागप्रमुखांनी मागील चार महिन्यांच्या उत्पन्नाचा लेखाजोखा मांडला. त्यामध्ये बांधकाम विभागाचे उत्पन्न घटल्याची बाब समोर आली. तर मिळकतकराची वसुलीही केवळ पन्नास टक्क्यांच्या आपासपासच राहिली आहे. लॉकडाऊनचा इतर व्यवसायाबरोबरच बांधकाम व्यवसायावरही झाला. परिणामी महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आटला.
एप्रिल महिन्यापासून बांधकाम विभागाचे उत्पन्न कमी झाले आहे. एप्रिल महिन्यामध्ये 81 लाख 63 हजार 742 इतके उत्पन्न मिळाले. तर हेच उत्पन्न मागीलवर्षी एप्रिल महिन्यामध्ये 22 कोटी 97 लाख इतके होते. एप्रिल ते जुलै या चार महिन्यात महापालिकेला बांधकाम विभागाकडून फक्त 28 कोटी 43 लाख 40 हजार इतके उत्पन्न मिळाले आहे.
तर याच विभागाचे मागीलवर्षी फक्त जुलै या एका महिन्याचे 83 कोटी 16 लाख 46 हजार रुपये इतके होते. यावर्षी जुलै महिन्यामध्ये 11 कोटी 68 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. करसंकलन विभागाच्या वतीने शहरातील मिळकत करांची वसुली करण्यात येत आहे. मागीलवर्षी 1 एप्रिल ते 14 ऑगस्ट 2019 पर्यंत 313 कोटी 53 लाखांची वसुली केली होती. यावर्षी त्यामध्ये घट झाली आहे. यावर्षी एप्रिल ते 14 ऑगस्ट या कालावधीत फक्त 190 कोटी 56 लाख रुपयांची वसुली झाली आहे. उत्पन्नामध्ये फरक पडल्याने महापालिका अर्थिक अडचणीत सापडली आहे.
इतर विभागांच्या वसुलीकडे दुर्लक्ष
महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळत असताना प्रशासनाने मात्र इतर विभागांच्या उत्पन्नाकडे दुर्लक्ष केले आहे. भूमी व जिंदगी विभाग तसेच आकाशचिन्ह, परवाना विभाग या दोन्ही विभागांचे उत्पन्न दरवर्षी कमीच असते. आकाशचिन्ह विभागाकडून या काळामध्ये चांगली वसुली करता येऊ शकते. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.