पिंपरी-चिंचवड : शिवसेनेला अद्यापही सत्ता वनवासच

महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपाकडून ‘ठेंगा’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून स्वतंत्र राहिलेल्या आणि स्थायी समिती आणि लोकसभा निवडणुकीमध्ये युती करणाऱ्या शिवसेना भाजपामधील दरी अद्यापही कायम आहे. स्थायी समिती निवडणुकीदरम्यान महापालिकेच्या सत्तेत शिवसेनेला सामावून घेवू अशी घोषणा करणाऱ्या भाजपाने शिवसेनेला प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडीत ठेंगा दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. आठ पैकी एकाही समितीवर स्थान देण्यात न आल्यामुळे युतीच्या वल्गना करणाऱ्या भाजपाने शिवसेनेचा सत्ता वनवास कायम ठेवला आहे.

गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना आणि भाजपामधील युती संपुष्टात आली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतही शिवसेना भाजपा युती अस्तित्त्वात आली नव्हती. महापालिकेत सध्या भाजपातची एकहाती सत्ता असून शिवसेना गेल्या दोन वर्षांपासून विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात शिवसेना आणि भाजपाच्या युतीची घोषणा झाली आणि त्यानंतर महापालिकेत स्थायी समितीच्या निवडणुकीत युती अस्तित्त्वात आली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला महापालिकेच्या सत्तेत समावून घेतले जाईल, अशी घोषणा केली होती.

त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेकांच्या प्रयत्नानंतर युती अस्तित्त्वात आली. सध्या महापालिका निवडणुकीत प्रभाग अध्यक्ष निवडीचे वारे वाहत आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपाने आपले आठही प्रभाग अध्यक्षांचे उमेदवार जाहीर केले मात्र शिवसेनेला प्रभाग अध्यक्षपदी कोठेही स्थान न देता ठेंगाच दाखविला. यामुळे निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी केलेली युतीची घोषणा हवेत विरली आहे. विशेष बाब म्हणजे भाजपाचे प्रभाग अध्यक्षांना उमेदवारी देताना आपल्या तीन नगरसेवकांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे.

अध्यक्ष निवडताना शिवसेनेचा कोणताच विचार झाला नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना आणि भाजपामध्ये शहरपातळीवर तसे विळ्या भोपळ्याचे राजकारण आहे. दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांमध्ये असलेले मतभेद युतीसाठी कधीच पोषक ठरलेले नाहीत. दोन्ही पक्षाचे नेते निवडणुकांपुरते सोयीस्कर राजकारण करतात हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या प्रभाग अध्यक्षापासून शिवसेनेला वंचित ठेवणारा भाजपा शिवसेनेचा सत्ता वनवास संपविणार की नाही? याकडे लक्ष लागले आहे.

आता लक्ष विषय समित्यांकडे

स्थायी समिती अध्यक्ष, प्रभाग अध्यक्षांच्या निवडीनंतर आता विषय समित्यांच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महिला बालकल्याण, क्रीडा, विधी, जैव विविधता, शहरसुधारणा, शिक्षण या विषय समित्यांवर शिवसेनेला स्थान दिले जाणार की या ठिकाणीही ठेंगा दाखविला जाणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.