कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष : कक्षामध्ये उपस्थित नसताना दिवे, पंखे सुरूच
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वीज बचतीबाबत गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. अधिकारी व इतर कर्मचारी आपल्या कक्षामध्ये उपस्थित नसतानाही कक्षातील लाइट व पंखे सुरूच असतात. त्यामुळे विजेचा अपव्यय आणि करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे पिंपरी येथे मुख्यालय आहे. चार मजली असलेल्या मुख्यालयात शेकडो अधिकाऱ्यांचे कक्ष आहेत. राजकीय पदाधिकाऱ्यांचेही कक्ष आहेत. तसेच मुख्य अधिकाऱ्यांना कक्षासहित खासगी कक्षही (अँटी चेंबर) आहेत. या कक्षांमध्ये अधिकारी उपस्थित नसतानाही लाइट व पंखे सुरू असतात. अधिकारी खासगी कक्षामध्ये बसल्यानंतर त्याठिकाणचे पंखे, वातानुकूलित यंत्र व लाइट सुरू करतात.
तेथून पुन्हा मुख्य कक्षात येतात पण खासगी कक्षातील लाइट व पंखे बंद करत नाहीत. तसेच स्थापत्य व बांधकाम विभागातील अधिकारी अनेकवेळा बाहेर फील्डवर जात असतात. ते बाहेर गेल्यानंतरही कित्येक तास वीज व पंखे तसेच सुरू असतात. याकडे संबंधित कक्षातील कर्मचारीही दिवे आणि पंखे बंद करण्याचे कष्ट घेत नाहीत.
गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेमध्ये विजेचा अपव्यय सुरू आहे. ही गोष्ट अनेकदा काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उजेडात आणली आहे. मात्र याकडे आयुक्तांनीही दुर्लक्ष केले आहे.
राजकीय पदाधिकाऱ्यांमध्येही जागरुकतेचा अभाव
तिसऱ्या मजल्यावर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे कक्ष आहेत. अनेकदा या पदाधिकाऱ्यांच्या कक्षातीलही लाइट व पंखे सुरू असतात. याच मजल्यावर विविध समितीच्या सभापतींचे कक्ष आहेत. हे सभापती आठवड्यातील एखादा दिवस उपस्थित असतात. मात्र अनेकदा कक्षातील लाइट व पंखे सुरू असतात. पदाधिकारीच जागरुक नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोण वचक ठेवणार?