पिंपरी -जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेसह शहरातील शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सलग दोन दिवस संप केला. तिसऱ्या दिवशी (गुरूवारी) पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर महापालिकेचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले. पेन्शनच्या मागणीला आमचा पाठींबा असून काळ्या फिती लावून कामकाज सुरू केल्याचे कर्मचारी महासंघाच्या पदाधिकऱ्यांनी सांगितले.
जुनी पेन्शन योजना लागू करावी. प्रदीर्घ काळ कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांना समान वेतन देऊन सेवेत नियमित करावे. महापालिकेतील रिक्त पदे भरावीत अशा विविध मागण्यांसाठी कर्मचारी मंगळवार (दि.14) पासून बेमुदत संपावर गेले होते. मंगळवारी मागण्यांबाबत तोडगा निघाला नसल्याने बुधवारीही बेमुदत संप सुरू होता. जुनी पेन्शन लागू असलेले कर्मचारीही संपात सहभागी झाले होते. दोन दिवस संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिका, क्षेत्रीय कार्यालये पूर्णपणे बंद होती. महापालिकेचे कामकाज ठप्प झाले होते.
कर्मचाऱ्यांमध्ये दोन गट
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी महापालिका सेवेत रुजू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर रुजू व्हावे. विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याबाबत आदेश द्यावेत. कामावर रुजू न झाल्यास शिस्तभंग कारवाईस पात्र राहतील असा इशारा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला होता. त्यामुळे पेन्शन लागू असलेले आणि पेन्शन लागू नसलेले अशा कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडली. 2005 पूर्वीच्या जुनी पेन्शन लागू असलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याची भूमिका घेतली. त्यानुसार सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून कामकाज सुरू केले. मात्र, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे.
महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असला तरी राज्याच्या विविध भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अद्याप संप सुरू आहे. त्यामुळे संपकरी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतनात कपात करायची की नाही? याबाबतचा राज्यस्तरावर जो निर्णय होईल, त्यानुसार महापालिकेत कार्यवाही करण्यात येईल.
विठ्ठल जोशी, उपायुक्त,
सामान्य प्रशासन विभाग
शहरातील इतर शासकीय कार्यालयात संप सुरूच
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालय, शिधा पत्रिका कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप सुरूच होता. त्यामुळे या कार्यालयातील कामकाज विस्कळीत झालेले आहे.