नवनियुक्त उपमहापौरांच्या समर्थकांचा जल्लोष; आयुक्तांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवनियुक्त उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांच्या नियुक्तीनंतर भाजपा पदाधिकारी, नगरसेवक व त्यांच्या समर्थकांनी करोना नियमांचे उल्लंघन करत महापालिका प्रवेशद्वारासमोर तुफान जल्लोष केला. यावेळी सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला होता. तर अनेकांनी मास्कही परिधान केला नव्हता. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करणारे आयुक्त आता उपमहापौरांवर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शहरातील करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाइन पद्धतीने पार पडली. राष्ट्रवादीने या निवडणुकीतून माघार घेतल्याने प्रभाग क्रमांक चार दिघी, बोपखेलचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भाजपच्या हिराबाई घुले यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. शहरात करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. प्रतिदिन चौदाशेहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे.
नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रशासन दंडात्मक कारवाई करते. महापौर जनता कर्फ्यूचा इशारा देतात. असे असताना नवनियुक्त उपमहापौर घुले, त्यांच्या समर्थकांना या सर्वांचा विसर पडल्याचे दिसून आले. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर तुफान गर्दी करत उपमहापौरांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
सुरक्षित अंतराची पुरती वाट लागली होती. अनेकांनी मास्कही परिधान केला नव्हता. महापालिका प्रशासनाने या गर्दीला रोखले देखील नाही. आयुक्त राजेश पाटील आता उपमहापौर आणि त्यांच्या समर्थकांवर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.