कडकोट पोलीस बंदोबस्त : अनेकांनी स्वत:हून काढली अतिक्रमणे
पिंपरी – महाराष्ट्र औद्यगिक विकास महामंडळाच्या चिंचवड कार्यालयाच्या वतीने मंगळवारी (दि. 5) भोसरी-टेल्कोरोडवरील अनधिकृत शेडवर कारवाई करण्यात आली. या कारवाईकरिता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर एमआयडीसीच्या नोटिशीनंतर बहुतांशी व्यावसायिकांनी अतिक्रमण स्वत:हून काढून घेतल्याचे दिसून आले.
औद्योगिक वसाहतीमधील एमआयडीसीच्या अनेक भूखंडांवर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे निष्कषित करण्यासाठी एमआयडीसीच्या वतीने मंगळवारी (दि. 5) विशेष मोहीम राबविण्यात आली. तत्पूर्वी याठिकाणच्या व्यावसायिकांना दहा दिवसांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटीसमध्ये संबंधित व्यावसायिकाने एमआयडीसीच्या जागेत अतिक्रमण केले असून, ते तत्काळ काढून घ्यावे. अथवा जागेतील बांधकामाचा मंजूर नकाशा एमआयडीसीला सादर करण्याचे नमूद केले होते.
या सर्व घडामोडींनंतर मोठ्या पोलीस फौजफाट्यासह एमआयडीसीचे अधिकारी गवळीमाथा परिसरात मंगळवारी (दि. 5) सकाळी दाखल झाले. एमआयडीसीच्या नोटिशीनंतर अनेक व्यावसिायकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. तर काही टपरीचालकांनी या कारवाईला विरोध केला.
यावेळी कष्टकरी पंचायतीचे बाबा कांबळे, बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध, अनिता सावळे आणि संदीपान झोंबाडे यांनी याठिकाणी धाव घेतली. महापालिका प्रशासनाने या टपरीधारकांना अधिकृत परवाना दिला असून, ही कारवाई चुकीची असल्याची बाब एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच ही जागा एमआयडीसीच्या मालकीची असताना, एकाच टपरीधारकाला दोन वेगवेगळ्या मिळकतीच्या क्रमांकाने नोटीस बजावण्यात आली असल्याची बाब एमआयडीसीचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांचा निदर्शनास आणून दिली.
या सर्व घडामोडी सुरु असताना महापालिकेचे अधिकारीदेखील याठिकाणी दाखल झाले. यावेळी एमआयडीसी महापालिकेच्या अधिकृत परवान्याची पडताळणी करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली.