पिंपरी – पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या व क्षेत्रफळ निम्मेही नाही. तरीदेखील महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये पिंपरी चिंचवड शहराने बाजी मारली आहे. पुणे महापालिकेपेक्षा 399 कोटी रुपयांनी अधिकचे अंदाजपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि. 17) स्थायी समितीपुढे सादर केले. याउलट पुणे शहराची लोकसंख्या व क्षेत्रफळ जास्त असतानाही पुणे महापालिकेचे 399 कोटी रुपयांनी कमी 6229 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे.
पुणे शहराची लोकसंख्या 55 लाखांपेक्षा जास्त आहे. तसेच शहराचे क्षेत्रफळ 331 चौरस किमी आहे. पुणे शहरापेक्षा पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेच्या वतीने शहररचना, सार्वजनिक सुरक्षितता, आरोग्य व वैद्यकीय, प्राथमिक शिक्षण यावर जादा खर्च करण्यात येणार आहे. तसेच उद्यान, पर्यावरण व महिला सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन मोठ्या प्रकल्पांचा समावेश नाही. जे प्रकल्प सुरू आहेत, तेच प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहराचे क्षेत्रफळ 181 चौरस किमी आहे. तसेच लोकसंख्याही कमी आहे. मात्र तरीही पिंपरी चिंचवड शहराचे अंदाजपत्रक दरवर्षी पुणे शहरापेक्षा जास्त असते. मागीलवर्षी पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक 6085 कोटी होते. तर पिंपरी चिंचवड महापालिकेचे 6183 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक होते. यावर्षीही पिंपरी चिंचवड शहराने अंदाजपत्रकामध्ये पुणे शहराला मागे टाकले आहे. त्यामुळे पुणे शहरापेक्षा पिंपरी चिंचवड शहर श्रीमंत असल्याची चर्चा सुरू आहे.