मागणी वाढली : मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरही घसरले
पिंपरी – यावर्षी स्ट्रॉबेरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारात स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. आवक वाढल्यामुळे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. त्यामुळे, महाबळेश्वर, वाईमधून आवक होणाऱ्या लालचुटक स्ट्रॉबेरीची पिंपरी-चिंचवडच्या बाजाराला भुरळ पडली आहे. आवक वाढल्याने दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत, यामुळे स्ट्रॉबेरीला सध्या बाजारात चांगली मागणी दिसत आहे.
या वर्षी महाबळेश्वर परिसरात पारा चांगलाच घसरला होता. अनुकूल वातावरणाचा फायदा झाल्याने महाबळेश्वर, वाई परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पादन चांगलेच वाढले. यावर्षी फेब्रुवारी महिन्याचा उर्तरार्थ सुुरु असला तरी पिंपरी-चिंचवड शहराच्या घाऊक आणि किरकोळ बाजारात उत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरीची आवक वाढली आहे. दरवर्षी महाग असलेल्या स्ट्रॉबेरीचे दरही आता नियंत्रणात आले आहेत. त्यामुळे आत्ता खवय्यांना हवी तितकी स्ट्रॉबेरी बाजारात उपलब्ध झाली आहे.
स्ट्रॉबेरी हे तसे नाजूक फळ असल्याने घाऊक बाजारात त्याची आवक बॉक्समध्येच होते. दरवर्षी नोव्हेंबरपासून स्ट्रॉबेरीची आवक बाजारात सुरु होत असते, मात्र यावेळी पाऊस आणि त्यामुळे खराब झालेल्या रोपांमुळे अनेकांची स्ट्रॉबेरीची शेती पाण्याखाली गेली. यामुळे स्ट्रॉबेरीचा पहिला हंगाम लांबला. पाऊस थांबल्यावर अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा लागवड करून रोपांची काळजी घेऊन स्ट्रॉबेरी वाढवली. या काळात चांगली थंडी पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्ट्रॉबेरीला पोषक असे वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळे उत्तम दर्जाची स्ट्रॉबेरी बाजारात आता येऊ लागली आहे, अशी माहिती स्ट्रॉबेरीच्या घाऊक व्यापाऱ्यांनी दिली आहे.
वीस रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत
महाबळेश्वर, वाई आणि जावळीमधून ही स्ट्रॉबेरी बाजारात येते. यात विंटर डाऊन, नाभीला, कामरोझा, आर वन, एस वन या प्रकारातील स्ट्रॉबेरी बाजारात येत आहे. या स्ट्रॉबेरी चवीला गोड आहेत. घाऊक बाजारात उत्तम दर्जाचा स्ट्रॉबेरीचा एक बॉक्स 20 रुपयांपासून 40 ते 50 रुपये, एक नंबरचा स्ट्रॉबेरीचा बॉक्स 25 ते 30 रुपये आणि दोन नंबरचा स्ट्रॉबेरीचा बॉक्स 18 ते 20 रुपयांत उपलब्ध आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीला बाजारात मागणी आहे.