पिंपरी – आता कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरण्यासाठीही खिश्याला अधिक झळ बसणार आहे. शहरातील लॉंड्री संघटनेने वाढत्या महागाईच्या नावाखाली थेट 25 टक्के दरवाढ केली जाणार आहे. येत्या आर्थिक वर्षात 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याची झळ बसणार आहे.
पिंपरी चिंचवड शहर लॉंड्री संघटनेची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व मागील वर्षाचा अहवाल सादर करण्यात आला. शहराध्यक्ष सुनील पवार हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. संघटनेच्या सभासदांनी काही तक्रारी व अडचणी या बैठकीत अध्यक्ष पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या. येत्या नवीन आर्थिक वर्षांमध्ये कपड्याचे दर वाढवण्याचा सर्वांनुमते ठराव करण्यात आला.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून वाढती महागाई व वाढते वीज दर पाहता प्रत्येक नगामागे किमान 25 टक्के दरवाढ करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. तसेच लॉंड्री व्यवसायामध्ये कारागीर यांना एक एप्रिल पासून तीनशे रुपये शेकडा दर लागू करण्याचा ठराव पास करण्यात आला. तसेच ही दरवाढही येत्या एक एप्रिल 2023 पासून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला लागू होईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर लॉंड्री संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष विशाल जाधव यांनी जाहीर केले.
बैठकीचे आयोजन विलास व्यवहारे यांनी केले. या बैठकीला राहुल शेलार, परमेश्वर पैठणकर, अब्दुल कलाम, अमोल मोरे, विक्रम जाधव, कल्याण व्यवहारे, प्रभाकर सोनटक्के, ज्ञानेश्वर मुळे, वकील कनोजिया, बालाजी वाघमारे, विलास व्यवहारे, गणेश गोरे, दत्तात्रय सौदागर, विनोद पोतेकर, संतोष गोतावळे आदी सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक राहुल शेलार यांनी केले. गणेश गोरे यांनी आभार मानले.
वीज बिलात सवलत
महाराष्ट्र शासनाने लॉन्ड्री व्यवसायिकास लघुउद्योजकाचा दर्जा दिला असून विविध योजना महाराष्ट्र शासनाने लागू केलेले आहेत. लॉन्ड्री व्यावसायिकांना वीज बिल दरामध्ये सवलत देण्याचा शासकीय अध्यादेश राज्य शासनाने पारित केला आहे. या योजनेचा लाभ घ्यावयचा असल्यास शहराध्यक्ष सुनील पवार यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन सुनील पवार यांनी केले.
1 एप्रिलपासून लागू होणारे सुधारित दर
एक शर्ट पॅन्ट
वीस रुपये
लेडीज ड्रेस तीस रुपये
अर्जंट कपडा पंधरा रुपये इस्त्री दर
ड्रायक्लीन शर्ट पॅन्ट प्रती नग साठ रुपये
ड्रायक्लीन साठी साडीचा दर साडी पाहून