पिंपरी – रुग्ण नसताना खासगी रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरसाठी कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर करण्याचे कारण काय? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. भोसरी विभागप्रमुख धनंजय आल्हाट, उप-शहरप्रमुख अनिल सोमवंशी, राहुल गवळी, सचिन सानप, जिल्हा संघटिका (शिरूर) सुलभा उबाळे, कुणाल तापकीर यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
त्यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोना महामारीच्या काळात कोविड सेंटरची मोठ-मोठी बिले अदा करण्यात आली आहे. साबणापासून सॅनिटाझरपर्यंत प्रत्येक गोष्टी “एमआरपी’पेक्षा जास्त दराने घेतल्या आहेत. तसेच अनेक संस्थांनी करोना काळात “सीएसआर’ स्वरूपात महापालिकेला मदत म्हणून अनेक वस्तू दिल्या आहेत. त्याचा हिशोबच नाही.
करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेबरोबर खासगी रूग्णालयात 24 कोविड सेंटरला परवानगी दिली. कोविड सेंटरसाठी कोट्यावधी रूपयांची बिले अदा करण्यात आली आहेत.