पिंपरी(प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अमृत योजनेंतर्गत विकासकामे सुरू आहेत. राज्यातील महापालिकांमध्ये ही योजना सुरू असून, त्यासाठी राज्य शासन दरवर्षी प्रोत्साहनपर निधी देते. यंदा शहराला 2 कोटी 7 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. अनुदान रकमेमध्ये इतर महापालिकांमध्ये शहराचा तिसरा क्रमांक लागला आहे.
शहरामध्ये अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा टप्पा 1, टप्पा 2, मलनिस्सारण आणि हरित क्षेत्र म्हणजेच बगीचा विकसित करण्याचे काम सुरू आहे. अमृत योजनेंतर्गत सुधारणांची पूर्तता करणाऱ्या राज्यांना केंद्र शासनाकडून प्रोत्साहन अनुदान मंजूर करण्यात येते. राज्य शासनाने 2015 पासून 2018 पर्यंत या तीन आर्थिक वर्षामध्ये 40 टक्के अनुदान अमृत योजनेमार्फत शहरांना वितरित केले आहे. केंद्र शासनाने दिलेल्या सुधारणांच्या यादीनुसार महापालिकेने गेल्या चार वर्षांत ई-गव्हर्नस, लेखा पद्धतीचा अवलंब, नागरी नियोजन आणि शहर पातळीवर योजना, बांधकाम उपविधी आढावा, स्वच्छ भारत अभियान अशा दहा सुधारणांची पूर्तता केली आहे.
सद्यस्थितीत राज्य शासनाकडे जमा असलेल्या 85 कोटी 95 लाख रुपये अनुदानामधून 44 महापालिकांना अनुदान देण्यात आले आहे. त्यामध्ये शहराला 2 कोटी 7 लाख 57 हजार रुपये अनुदान मिळाले आहे. तर पहिल्या क्रमाकांचे अनुदान नवी मुंबई महापालिका व द्वितीय धुळे महापालिकेला मिळाले आहे.