पिंपरी – बुधवारी दिवस-रात्र कोसळलेल्या पावसाने पिंपरी-चिंचवड शहर गारठले आहे. बुधवारी पहाटे तीन वाजेपर्यंत चिंचवडमध्ये सर्वाधिक 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी मात्र पावसाने दिवसभर काहीसा दिलासा दिला असला तरी दिवसभर धुके आणि थंडीचा जोर होता.
गुरुवारी सायंकाळी पुणे वेधशाळेने प्रकाशित केलेल्या आकड्यांनुसार कमाल तापमान 20.6 अंश तर किमान तापमान 15.5 अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले. पण हवेत आद्रता खूप असल्याने चांगलाच गारठा जाणवत आहे. वेधशाळेने पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदेव व लक्षद्वीप व चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व व मध्य अरबी समुद्रात द्रोणीयस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव व लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पावसाने विश्रांती घेतली असली, तरीदेखील तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.