अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी महापालिका प्रशासनाकडून अद्याप वाटप नाही
पिंपरी – महापालिकेच्या प्राथमिक शाळांतील 40 हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप वह्या मिळालेल्या नाहीत. त्याशिवाय, बूट-सॉक्स, दफ्तर, गणवेश, रेनकोट आदी साहित्याची देखील खरेदी झालेली नाही. पाठ्यपुस्तकांचे मात्र वाटप झाले आहे. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने अन्य शालेय साहित्य दिले नाही तरी किमान मुलांना अभ्यासासाठी वह्या, दफ्तर तरी देणे अपेक्षित होते.
जून महिन्यापासून 2020-21 हे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. सध्या करोना संसर्गामुळे अद्याप शाळा सुरू झालेल्या नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातंर्गत देण्यात येणारी पाठ्यपुस्तके घरपोच देण्यात आली. मात्र, अद्याप वह्याच मिळालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी स्वखर्चाने वह्या आणाव्या लागल्या आहेत.
महापालिकेच्या पहिली ते आठवीतील 105 प्राथमिक आणि आकांक्षा फाऊंडेशन संचालित 5 इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शालेय साहित्य दिले जाते. त्यामध्ये वह्या, पाठ्यपुस्तक, दफ्तर, स्वेटर, रेनकोट, बूट-सॉक्स, गणवेश, पीटी गणवेश आदी शालेय साहित्याचा समावेश आहे.
प्राथमिक शाळांमध्ये सुमारे 40 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 18 माध्यमिक शाळा असून त्यामध्ये 8 हजार 767 विद्यार्थी शिकत आहेत. माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश, पीटी गणवेश, स्वेटर, प्रयोगवही, नकाशा वही, संगणक वही, गणित प्रात्याक्षिक वही, भूगोल वही आदी साहित्य दिले जाते. यंदा पाठ्यपुस्तक वगळता प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना कोणतेही शालेय साहित्य देण्यात आलेले नाही. त्याची खरेदी प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
महापालिका शाळांमध्ये सध्या ऑनलाइन अभ्यास जरी सुरू असला तरी किमान विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दफ्तर, वह्या द्यायला हव्या होत्या. शाळा सुरु नसल्याने यंदा रेनकोट देण्यात आले नाहीत. आता हिवाळा सुरू आहे. दिवाळीनंतर शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळ्यात तरी किमान आता स्वेटर खरेदी करून प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे.
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्यासाठी भांडार विभागामार्फत खरेदी प्रक्रिया सुरू आहे. वह्यांसाठी निविदा कार्यवाही प्रलंबित आहे. करोना प्रादुर्भावामुळे यंदा शालेय साहित्य खरेदीवर परिणाम झाला आहे.
– ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग (प्राथमिक)