पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शहरात आज 2137 नवीन रुग्णांची भर पडली. तर 17 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. गेल्या 24 तासांतील रुग्णवाढीमुळे शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 18 हजारांच्या पुढे गेली आहे. शहरात सध्या 18,750 करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत शहरातील 1 लाख 42 हजार 251 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 2113 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 24 रुग्णांची नोंद झाली. तसेच दिवसभरात 17 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहरातील 15 व शहराबाहेरील 2 जणांचा समावेश आहे. शहरातील पिंपरी, वाल्हेकरवाडी, चिंचवड, तळवडे, निगडी, दिघी, कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड, चिखली, काळेवाडी येथील 15 जणांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील चाकण येथील 2 जणांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरामध्ये 1161 रुग्ण बरे झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 251 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4464 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 2085 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 3360 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 15,390 वर पोहचली आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 18,750 इतकी आहे.
दिवसभरात 11082 जणांना लस
एक एप्रिलपासून 45 पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यास प्रारंभ झाला. 16 जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात करोना योद्धे असणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर फ्रंटलाइन वॉरियर्स आणि ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना लस देण्यात येऊ लागली. आतापर्यंत रोज दोन ते पाच हजार नागरिकांना लस देण्यात येत होती. परंतु एक एप्रिल रोजी दिवसभरात 11,082 जणांना लस देण्यात आली. लसीकरणाला वेग देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.