पालिकेकडून नियोजन : डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलिसांना प्राधान्य
पिंपरी – नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तीन ठिकाणी तयार होणाऱ्या लसींचा आढावा घेतला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला लस येण्याची आशा पल्लवित झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने शहरातील फ्रंट लाइनवरील करोना वॉरियर्सना सर्वप्रथम लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून शहरामध्ये करोनाला हरविण्यासाठी काम करणाऱ्या दहा हजार जणांना पहिल्या टप्यात लस देण्यात येणार आहे. तसे नियोजन पालिकेच्या वतीने शासनाला कळविण्यात आले आहे.
राज्याचे प्रधान सचिव कार्यालयाने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून भविष्यातील नियोजनाबाबत माहिती मागविली आहे. त्यासाठी पालिकेने पहिल्या टप्यात 10 हजार जणांची यादी पाठविली आहे. यामध्ये महापालिका व खासगी रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, करोनासंदर्भात काम करणारे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स असे पालिकेचे 2 हजार 250 कर्मचारी आहेत. तर पिंपरी चिंचवड प्राधिकरण, एमआयडीसी, नारी, पोलीस, पोस्ट, रेल्वे आणि महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
करोनासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यात लस दिली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्यात दहा हजार जणांना लस देण्याचे नियोजन केले आहे. राज्य शासनाकडून लस उपलब्ध झाल्यानंतर शहरात लस देण्याची मोहिम हाती घेतली जाईल. त्यासाठी वैद्यकीय विभागाची स्वतंत्र पथके तयार करण्यात येणार आहे. निश्चित केलेल्या यादीनुसार लस देण्यात येणार आहे. मात्र लस मोफत मिळणार की ती विकत घ्यावी लागणार याबाबत अद्याप माहित नसल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.
लस आल्यानंतर…..
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या वर पोहचली आहे. पहिल्या टप्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण शक्य नाही. तसेच सरकारने याबाबत तसे निर्देश दिले असून पहिल्यांदा पहिल्या फळीतील करोना योद्ध्यांना लस देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे लस आल्यानंतर पहिल्यांदा शहरातील करोना योद्ध्यांचा विचार केला जाणार आहे. त्यासाठी 10 हजार फ्रंट लाईन वर्कर्सची यादी शासनाकडे देण्यात आली आहे.
यांना प्राधान्य
महापालिकेचे 2250 कर्मचारी, कोविडसाठी काम करणारे कर्मचारी, खासगी रुग्णालयाचे डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलिस खात्यातील कर्मचारी, पीएमआरडीए, पोस्ट खात्यातील कर्मचारी, नारी, सीआयआरटी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणमधील कर्मचारी यांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील करोनासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रथम लस देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. महापालिकेच्या अडीच हजार कर्मचाऱ्यांसह शहरातील करोना योद्धांची यादी करण्यात आली आहे. लस आल्यानंतर लस देण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण केले जाईल.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, पिं. चिं. महापालिका.