पिंपरी चिंचवड : १५४ कोटींचा दंड तरी नियम धाब्यावरच

पिंपरी (संदीप घिसे) – वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड बसल्यावर त्यांच्या वर्तनात सुधारणा होईल, अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांना होती. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यापासून गेल्या पाच वर्षांत 28 लाख 52 हजार 831 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून एक अब्ज 54 कोटी, 52 लाख 40 हजार 650 रुपयांचा दंड आकारण्यात आला. वाहतूक पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईनंतरही शहरातील वाहन चालकांना अद्याप शिस्त लागलेली नसल्याचे दिसून येते.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना 15 ऑगस्ट 2018 मध्ये झाली. पुढील महिन्यात आयुक्तालयाला पाच वर्ष पूर्ण होत आहे. शहरात सूक्ष्म, लघु, मध्यम तसेच मोठे असे एकूण 11 हजार कंपन्या शहरात असल्याने या कंपन्यांना कच्चा माल पुरविणारी वाहनेही शहरात येत असतात. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये वाढ झाल्याने एज्युकेशन हबमध्ये शिकण्यासाठी बाहेरील राज्यातूनही विद्यार्थी आले आहेत. त्यामुळे शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. एकेकाळी प्रशस्त असणारे रस्तेही आता अपुरे पडत आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच बेशिस्त वाहन चालकांमुळेही वाहतूक कोंडी होत आहे.
वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जाते. विशेषतः रॉंग साइड, रॅश ड्रायव्हिंग, मोबाइल टॉकिंग, सिग्नल जंपिंग, ट्रिपल सीट, विना हेल्मेट, विना सीटबेल्ट, काळी काच, सायलेन्सर बदल केसेस, बसेस कारवाई, रिक्षा कारवाई या प्रमुख हेडखाली कारवाई करण्यात आली आहे. यापैकी बहुतांश वाहन चालकांना ऑनलाइन दंड केला आहे. रस्त्यावर वाहतुकीचे नियमन करणारे पोलीस प्रत्यक्ष कारवाई करीत आहेच. याशिवाय सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही कारवाई करण्यास सुरवात केली आहे.

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघात होऊन त्यात अनेकांचा बळी जातो. प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पूर्वी दंडाची रक्कम कमी होती. आता ती वाढविण्यात आली आहे. तसेच आता चौकात जरी पोलीस नसला तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर वाहन चालकांवर आहे. वाहतूक विभागाच्या चौक्या आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात बेशिस्त वाहन चालकांवरील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. – विठ्ठल कुबडे, सहायक आयुक्त-वाहतूक विभाग





