माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावरुन पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजपामधील या असंतोषाचा फायदा करुन घेण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पक्षाने प्रयत्नही सुरू केले असून शहरात सांगली पॅटर्न राबविण्याचा वारंवार सूतोवाच केला आहे. भाजपमधील बंडाळीचा आपल्याला फायदा होऊ शकतो, हे जाणून आता स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक गुप्त मतदानाद्वारे घेण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शुक्रवारी 5 मार्च रोजी होणारी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया ही आवाजी मतदान ऐवजी गुप्त मतदानाद्वारे घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे काटे यांनी केली आहे. काटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, रवी लांडगे यांची नाराजगी, भाजप मधील अंतर्गत गटबाजी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेला सांगली पॅटर्नचा दाव्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे जर गुप्त मतदान झाले तर पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.
भाजपचे काही सदस्य करणार मदत
काटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, सत्ताधारी भाजपच्या गलिच्छ राजकारणाला त्यांचेच नगरसेवक पुरते वैतागले आहेत. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे काही सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला मदत करणार आहेत, परंतु आवाजी मतदान प्रक्रियेमुळे ते धास्तावत आहेत, त्यामुळे गुप्त मतदान घेतले तर खात्रीशीर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला बहुमत मिळणार आहे. हीच भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांना आहे, त्यामुळे स्थायीच्या विद्यमान सदस्यांना शपथ देऊन बांधून घेण्याचा कुटील डाव सत्ताधारी भाजप नेते करत असल्याची चर्चा आहे. आपल्या सदस्यांवर असा अविश्वास दाखवून भाजप नेते सदस्यांचा अपमान करत आहेत. याची प्रचंड चीड सदस्य खाजगीत व्यक्त करत आहेत.