पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दोन दिवसांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील काही तालुके वगळता सर्वत्र शनिवारपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्या अनुषगांने महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी शहरातील सर्वच शाळांना शुक्रवार (दि.15 जुलै) आणि शनिवार(दि.16 जुलै) आणखी दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.
चार ते पाच दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात वरूणराजा जोरदार बरसत आहे. आणखी एक ते दोन दिवस जोरदार पाऊस कोसळ्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचाही इशारा दिला आहे. त्याअनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच सर्व खासगी शाळा (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित) अशा सर्व शाळांना शनिवारपर्यंत (दि. 16 जुलै 2022) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी/ प्राथमिक/ माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळांना शनिवार दि. १६/०७/२०२२ अखेर सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
सविस्तर माहितीसाठी-
● Play store – https://t.co/uaj2roFAR5
● iOS – https://t.co/w2RkHpULPy#news #UPDATES #PCMCRainAlerts pic.twitter.com/T5NmFj2q9e— PCMC Smart Sarathi (@PCMCSarathi) July 14, 2022
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत परीक्षा
जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या सुट्टीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी दोन दिवस शहरातील सर्वच शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. असे असताना शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची सकाळी साडेसात ते साडेनऊ या कालावधीत नियतकालिक चाचणी होणार असल्याबाबत पालकांच्या मोबाईलवर गुरूवारी सायंकाळी संदेश पाठविले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलली
पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या, खासगी, विना अनुदानित शाळांमधून 5 वी आणि 8 वी मधील 11 हजार 355 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. पाचवीतील 7 हजार 94 विद्यार्थी 49 केंद्रांवर तर आठवीतील 4 हजार 261 विद्यार्थी 31 केंद्रांवर परीक्षा 20 जुलै रोजी होणार होती. मात्र, सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही परिक्षा 31 जुलै रोजी होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संजय नाईकवडे यांनी दिली.