पिंपरी-चिंचवड : कामासाठी डांबरी रस्ता खोदा अन्‌ खडीचा बनवा

  • स्मार्ट सिटीतील ठेकेदारांचा कारभार
  • प्रशासनाचे दुर्लक्ष ः नागरिकांना होतोय त्रास

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत. फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी ठेकेदारांकडून चांगला डांबरी रस्ता खोदला जातो; परंतु काम झाल्यानंतर मुरूम, खडी टाकून रस्ता बुजविला जातो. याचा नागरिकांना, वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

परंतु प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. अशा रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरात सर्वच क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. ही कामे संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक, पादचारी, वाहनचालक तसेच व्यावसायिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विकासकामे सुरू असताना रस्त्याच्या दोन्ही बाजू खोदून ठेवल्या जात आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत.

त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. काहींना अपघात होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामकाजाविषयी नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रशासन लक्ष देत नसल्याने ठेकेदार पाहिजे त्या पद्धतीने कामे करत आहेत. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.

चिखली येथील मोरे वस्ती, म्हेत्रे वस्ती, साने चौक, वाघू साने चौक ते चिंचेचा मळा आदी ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी केबल टाकण्याचे काम सुरू आहेत. ही भूमिगत केबल टाकण्यासाठी स्मार्ट सिटीचे काम घेतलेल्या ठेकेदाराने चांगले डांबरी रस्ते खोदले; परंतु काम झाल्यानंतर त्या रस्त्यावर मुरूम, खडी टाकून बुजून टाकले आहेत.

पावसामुळे मुरूम, खडी रस्त्यात इतरत्र पसरली जात आहे. रहदारीच्या रस्त्यावर खडी आल्याने वाहने घसरून अपघात होत आहेत. तर ज्येष्ठ नागरिक रस्त्याने चालताना त्यांना अपघात घडत आहे. काही ठिकाणी ड्रेनेज लाइनच्या बाजूने ही केबल टाकली आहे. तेव्हा रस्ता दुरुस्त करताना ते चेंबर मुरूम, खडीमध्ये बुजून टाकल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही.

त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीस व रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत ठेकेदार विकासकामे करत आहेत; परंतु दुरुस्तीची कामे व्यवस्थित करत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी देखील महापालिका प्रशासन, क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. अशी अर्धवट कामे करणाऱ्या ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

लोकप्रतिनिधींचा प्रभागाकडे कानाडोळा
एका प्रभागात चार नगरसेवक आहेत. आपल्या प्रभागात सुरू असलेल्या विकासकामांविषयी, तेथे होत असलेली कामे किती दर्जेदार आहेत, नागरिकांना झालेल्या विकासकामांचा काही त्रास आहे का याची चौकशी किंवा पाहणी देखील लोकप्रतिनिधी करताना दिसून येत नाहीत. अशी अर्धवटकामे करणाऱ्या ठेकेदारांविरोधात महापालिकेत आवाज उठविणे अपेक्षित आहे. परंतु ते यावर एक शब्द बोलताना दिसून येत नाहीत. अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.

सध्या पाऊस ये-जा करत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी रस्ता खोदाई केली तर तेच ठेकेदार व स्मार्ट सिटी विभाग तो रस्ता व्यवस्थित करून देणार आहेत. त्यामुळे ह्या रस्त्यांचे पावसाने उघडीप दिली की डांबरीकरण होईल.
– मनोज लोणकर, सहायक आयुक्‍त

Leave A Reply

Your email address will not be published.