बिजलीनगर अंडरपाससाठी 4.66 कोटींचा वाढीव खर्च
शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी – बिजलीनगर अंडरपासच्या अतिरिक्त 4 कोटी 66 लाख 48 हजार 563 एवढ्या खर्चाला कार्योत्तर मान्यता देण्याचा सदस्यपारित प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
मुदतबाह्य काम करून वाढीव खर्च दाखविणाऱ्या ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवडमधील बिजलीनगर येथे तयार करण्यात येत असलेल्या अंडरपासचे काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. 2 मार्च 2020 रोजी 24 महिन्यांची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय मुदतवाढ न घेता ठेकेदार मे. कृष्णाई इन्फ्रा यांनी हे काम सुरूच ठेवले. आता अतिरिक्त काम झाल्याचे दाखवून या कामासाठी सुमारे साडेचार कोटींच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव मांडला आहे. महापालिका प्रशासनाशी समन्वय न ठेवता सदस्यांच्या माध्यमातून ठेकेदाराने वाढीव खर्चासह सुधारित खर्चाचा ठराव मांडला आहे.या ठरावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
मूळ निविदेनुसार हे काम 14 कोटी 25 हजार एवढ्या खर्चाचे आहे. मात्र, ठेकेदाराने मुदतबाह्य कामांमध्ये वॉटर पाइप खोदकाम, विद्युत केबलसाठीचे खोदकाम, कठीण खडकामध्ये खोदकाम या कामांसाठी 1 कोटी 24 लाखांचा वाढीव खर्च लावला आहे.
यासह बांधकामातील बदल, स्टीलचे वाढलेले दर, अंडरपासच्या भिंतींसाठी टाइल्समध्ये केलेला बदल, विद्युत वाहिनी, जलवाहिनी स्थलांतरित करणे, मेनहोल चेंबर्सचे बांधकाम अशा अनेक बाबी नमूद करून ठेकेदाराने एकूण 4 कोटी 66 लाख 48 हजार 563 इतका वाढीव खर्च लावला आहे. त्यामुळे निविदेनुसार 14 कोटी 25 हजार एवढ्या खर्चाचे हे काम आता 18 कोटी 66 लाख 74 हजार 188 इतक्या खर्चावर गेले आहे. या प्रकरणात आर्थिक अफरातफर झाल्याचा संशय निर्माण होत आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. करोनाचे कारण दाखवून नागरिकांच्या पैशांची लूट थांबली पाहिजे. जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत वाढीव खर्चाचा प्रस्ताव थांबवावा. चौकशीत आढळलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सौंदणकर यांनी केली आहे.