पिंपरी-चिंचवडमध्ये मृत्यूचा उच्चांक, करोनाचे आणखी 61 बळी

पिंपरी – करोनामुळे आणखी 61 रुग्णांला प्राण गमावावे लागले आहेत. गेल्या एक वर्षातील हा मृत्यूचा उच्चांकी आकडा आहे. तर नवीन 2128 जणांना करोनाची लागण झाली आहे. ऑक्‍सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर उपलब्ध करून देताना प्रशासनाची दमछाक झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे प्राण जात आहेत. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येने एकूण बाधितांची संख्या पावणे दोन लाखांच्या पुढे गेली आहे.

पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (दि. 15) शहरात 2086 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील 42 जणांचा तपसाणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरातील 1 लाख 75 हजार 405 जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच आज तब्बल 61 बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील 36 तर शहराबाहेरील 25 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत 3243 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरामध्ये 2110 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 50 हजार 738 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 8597 संशयितांची चाचणी करण्यात आली. अद्याप 6549 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 6545 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 15,837 झाली आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 22,382 इतकी आहे. तसेच आज दिवसभरात 5712 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत 2 लाख 16 हजार 112 जणांना लस देण्यात आली आहे.

तरुणांचाही मृत्यू
शहरामध्ये पहिल्या लाटेमध्ये ज्येष्ठ नागरिक व त्यांना दुर्धर आजार आहे अशा बाधितांचा मृत्यू झाला होता. मात्र, सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात तरूणांचाही मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या 24 तासांमध्ये 32, 29 व 38 वर्ष वयाच्या रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. शहरातील मृतांची संख्या वाढल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.