“पिंपरी-चिंचवड दर्शन’ महिनाभरातच बंद

नियोजनशून्य कारभार : अव्वाच्या-सव्वा तिकीट दराचा परिणाम

पिंपरी – शहरात अनेक दिवसांच्या चर्चेनंतर पुणे दर्शन बसच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड दर्शन बस सुरू करण्यात आली. पीएमपीएमएल आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा गाजावाजा करून ही बस सुरू केली. परंतु, नियोजनशून्य कारभार आणि अव्वाच्या-सव्वा तिकीट दर यामुळे अवघ्या काही दिवसांतच ही बस बंद झाली आहे.

पीएमपीएलच्या वतीने पुणे शहरात पुणे दर्शन बस चालविली जाते. त्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतही दर्शन बस सुरू करण्याची महापालिकेची जुनी मागणी होती. त्यावर बस उपलब्ध नसल्याचे कारण देत पीएमपीकडून टाळाटाळ केली जात होती. मात्र, अखेर पीएमपीकडून ही दर्शन बस सुरू करण्यास मुहूर्त मिळाला. महिनाभरापूर्वी 3 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या बसचे उद्‌घाटन झाले होते. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने त्यासाठी मोठा गाजावाजा केला.

भोसरी व निगडी अशा दोन ठिकाणांहून ही वातानुकूलित बस धावणार होती. या दर्शन बसमधून देहू, आळंदीसह शहरातील मोरया गोसावी मंदिर, चापेकर वाडा, दुर्गादेवी टेकडी, सायन्स पार्कसाठी ठिकाणे पर्यटकांना दाखविण्याचे नियोजन होते. पाचशे रुपये तिकीट दर निश्‍चित करण्यात आला होता. तिकीट दर कमी करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून मागणी होत होती. परंतु, महापालिकेचा दिखावा आणि पीएमपी प्रशासनाचे चुकीचे नियोजन यामुळे ही दर्शन बस सध्या बंद आहे. बुकींग येत नसल्याचे कारण पीएमपी अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.