Pimpri Chinchwad Crime – बिस्किटाचे वाटप करून पुण्य मिळवण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची अंगठी लंपास केली. ही घटना बुधवारी (दि. २१ जानेवारी) रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास डी मार्ट जवळ, सम्राट जिम समोर, मोशी घडली.या प्रकरणी पंडित नाहदु गायकवाड (वय ६५, रा. गायकवाड वस्ती, जुना टोल नाका, मोशी, पुणे) यांनी शनिवारी (दि. २४) रोजी भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार सायकलवरील दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला रस्त्यात थांबवले. त्यांनी फिर्यादीला बिस्किटाचे पुडे आणि १५०० रुपये देऊन ‘हे बिस्किट लोकांना वाटा आणि पैसे मंदिरात दान करा’ असे सांगितले. आरोपींनी फिर्यादीच्या पाया पडून त्यांना दानधर्माच्या जाळ्यात ओढले आणि त्यांचे हात हातात घेऊन बोलण्यात गुंतवले. याच दरम्यान त्यांनी फिर्यादीच्या हातातील ५० हजार रुपये किमतीची ८ ग्रॅम वजनाची गणपती बाप्पाची नक्षी असलेली सोन्याची अंगठी हातोहात काढून घेतली आणि तिथून पळ काढला. भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.