पिंपरी – विश्वचषक क्रिकेटमधील इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या एका बुकीला गुंडा विरोधी पथकाने अटक केली. अटक केलेल्या बुकीकडून तब्बल 40 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 21) काळेवाडी येथे करण्यात आली.
दिनेश हरीश शर्मा (वय 38, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी परिसरात गस्त घालत असताना गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना माहिती मिळाली की, निरंकारी भवनजवळ, काळेवाडी येथे एकजण “क्रिकेट लाइव्ह लाइन इन ‘ या सोशल मिडिया ऍपद्वारे बेटिंग घेत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन दिनेश शर्मा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख 40 लाख रुपये, दोन मोबाईल फोन आणि एक कल्क्युलेटर असा एकूण 40 लाख 80 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, अंमलदार हजरत पठाण, गणेश मेदगे, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहिते, तौसीफ शेख व तांत्रिक विश्लेषण विभागाचे अंमलदार पोपट हुलगे यांनी केली.
क्रिकेट टीमसाठी असा होता दर
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या क्रिकेट सामन्यात इंग्लंड जिंकले एक रुपयाला 60 पैसे आणि दक्षिण आफ्रिका जिंकले तर एक रुपयाला 61 पैसे असा सुरुवातीचा भाव ठरलेला असतो. सामना सुरु झाल्यानंतर या भावात बदल होतो.