करोना चाचणी करण्यासाठी रुग्णांना थांबावे लागते उन्हात
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या “वायसीएम’ रुग्णालयात करोना चाचणी करण्यासाठी गेलेल्या रुग्णांना उन्हात ताटकळत थांबावे लागत आहे. रुग्णांचे प्रमाण वाढल्याने करोना तपासणी करण्यासाठी येणाऱ्या संशयित रुग्णांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात सुविधा वाढविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित कुदळे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून 600 ते 800 नवीन रुग्णांची दिवसाला भर पडत आहे. बाधिताच्या संपर्कातील नागरिकांचीही तपसाणी केली जाते. त्यामुळे करोना तपासणी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वायसीएम रुग्णालयात करोनाची चाचणी केली जाते. संशियतांची वाढती संख्या असल्याने चाचणीसाठी लवकर नंबर येत नाही.
बाहेर कडक ऊन आहे. नागरिकांना उन्हात थांबावे लागते. त्यासाठी सावलीसाठी मंडप टाकण्यात यावा. सुरक्षित अंतराचे पालन केले जात नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच रुग्ण वाढल्याने वायसीएमवरील ताण वाढला आहे. त्यांना सुविधा वाढवून देण्याची आवश्यकता असल्याचेही कुदळे म्हणाले.