पिंपरी – पिंपरीतील एका खासगी रुग्णालयातील करोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या उपचारादरम्यान संपर्कात आलेल्या 42 डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. रिक्षा चालकावर खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर तो चालक करोना बाधित असल्याचे समोर आले होते. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे
एकाच दिवशी सहा जणांना करोनाची लागण झाली होती. त्यामध्ये दिल्लीतून आलेल्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील चार, अमेरिकेतून आलेला एक आणि पिंपरीतील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा समावेश होता.
खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रिक्षाचालकाचा अपघात झाला होता. त्याच्यावर पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होती. त्याचे ऑपरेशन करीत असताना या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दोन दिवसांपूर्वी त्या रिक्षाचालकाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तो रिक्षाचालक करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे खासगी रुग्णालयातील 42 डॉक्टर आणि 50 कर्मचारी हे संपर्कात होते. त्यांना रुग्णालयीन प्रशासनाने इतर कुणाच्याही संपर्कात न येता खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी ठेवले होते. मात्र यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या 42 डॉक्टरचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट आता आले असून सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.