पिंपरी-चिंचवड : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा गुन्हेगारांना इशारा

कायदा सुव्यवस्थेसाठी मोक्का कायदा लावणार तर वेशांतर करून अवैध धंद्याची माहिती घेणार

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तपदाचा डॅशिंग व देशातील एकमेव आयरन मॅन जागतिक किताब विजेते पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी नुकताच पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यावर त्यांनी शहरात अवैध धंदे, दादागिरी व गुन्हेगारी चालणार नसल्याचा दम देत, यापुढे माझ्या कारकिर्दीत असले प्रकार चालणार नसल्याचा इशारा डिजिटल प्रभाताला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर हे नवनिर्मित शहर असून येथे उद्योग धंदे असल्याने या शहरात राज्यातील व परराज्यातील कामगार कामासाठी इथे येतात. त्यांच्यावर अन्याय होत असेल, दादागिरी केली जात असेल तर, मोक्का कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधिंच्या चांगल्या कामांसाठी मदत करेन मात्र, चुकीच्या गोष्टीचे कधीच समर्थन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नसून त्यासाठी आपण वेशांतर करून शहरातील कायदा सुव्यवस्थेची माहिती घेणार आहे. तर, आयुक्तालयाच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असून, हिंजवडी, चाकण, तळेगाव येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

करोना महामारीत नागरिकांनी आपले फिटनेस चांगले ठेवत, मास्कचा वापर करावा व गर्दी टाळण्याचे आवाहन केले. शहरातील कायदा सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे व त्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.